Ausa News : एकीकडे वडिलांची अर्थी निघाली, अन ती परीक्षेला गेली

वडिलांचा मृतदेह अंगणात असतांना दिशा उबाळेने दिला दहावीचा पेपर
Disha Ubale
Disha Ubalesakal
Updated on

औसा - बाप आणि लेकीचं नाते किती घट्ट आणि प्रेमाचे असतात याचा अनुभव प्रत्येक लेक आणि तिचा बाप घेत असतो. वर्षभर अभ्यास करून दहावीच्या परीक्षेची तयारी करून पहिल्या पेपरला जातांना वडिलांचा आशीर्वाद घेऊ पाहणाऱ्या औसा तालुक्यातील भादा गावातील एका चिमुकलीला बाबांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातांना परीक्षेला जावे लागल्याची घटना घडली आहे.

अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या आपल्या बापाच्या अर्थीला पाहत ती हातात पेन, कंपास आणि पॅड घेऊन साश्रु नयनांनी मोटारसायकलवर बसून परीक्षेला निघाली. एकीकडे बाप परत दिसणार नाही ही भावना काळजाला पीळ पाडत होती, तर दुसरीकडे तिचे कर्तव्य तिला बसू देत नव्हते. दोलायमान अवस्थेत दिशाने कर्तव्याला प्रमाण मानून परीक्षेला सामोरी गेल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दिशा नागनाथ उबाळे ही भादा येथील शाळेत दहावीला आहे. शुक्रवारी (ता.२१) रोजी तिचा मराठीचा पहिला पेपर होता. दहावीची तयारी करून परीक्षेला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेल्या दिशाला नियतीने जबर धक्का दिला. दिशाचे वडील नागनाथ उबाळे यांचे गुरुवारी (ता. २०) रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

घरात ती, आई, एक भाऊ आणि आज्जी असे चारच लोक. बापाच्या अचानक निधनाने दिशा व तिचे कुटुंब सैरभैर झाले. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच दिशाच्या हातातील पुस्तक गळून पडले. हंबरडा फोडून रडणाऱ्या दिशाला आपल्या परीक्षेचा विसर पडला.

मात्र दिशाचे शिक्षक शिवलिंग नागापुरे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेम लटूरे यांनी कांहीही करून निशाचा पेपर वाया जाऊ नये यासाठी दिशाच्या नातेवाईकांची भेट घेतली. तिच्या कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेतले. निशाचे समुपदेशन केले. डोळे पुसत दिशा वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तयार झाली.

तिचा नंबर औसा शहरातील अजीम हायस्कुलच्या सेंटरमध्ये होता. दिशाच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची वेळ शुक्रवारी सकाळी साडे नऊची निश्चित झाली. भादा ते औसा हे अंतर १५ किलोमीटरचे आहे ते पार करण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागणार होता. शिक्षक नागापुरे, प्रेम लटूरे व गावातील अन्य लोकांनी दिशाच्या वडिलांची अर्थी उचलल्यावर दिशाला मोटारसायकलवर बसवले.

एकीकडे बाप अनंतात विलीन होण्यासाठी परत कधीही न येणाऱ्या मार्गवर होता. तर दुसरीकडे डोळे भरून अंतिम प्रवासाला निघालेल्या आपल्या बापाच्या अर्थीला पाहत दिशा परीक्षेला जाण्यासाठी मोटारसायकल वर बसली होती. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचून दिशाने आपला पहिला पेपर दिला. तिच्या कणखर आणि धाडसाचे कौतुक करीत अजीम संस्थेच्या वतीने सुलेमान शेख व तिथल्या शिक्षकांनी तिचे कौतुक करीत तिला शाबासकी दिली. दिशाने दाखविलेल्या या कणखर भूमिकेचे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com