महिला असुरक्षित; पाच वर्षांत 340 बलात्कार 

जालिंदर धांडे 
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यात एक हजार 69 महिला व मुलींची छेडछाड करण्यात आली. शाळा-महाविद्यालय व शिकविणीच्या परिसरात रोडरोमिओंचा त्रास वाढला आहे.

बीड - जिल्ह्यात सध्या रोडरोमिओंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 2015 पासून मे 2019 पर्यंत जिल्ह्यात 340 बलात्कार, तर छेडछाडीच्या एक हजार 69 घटना उघड झाल्या आहेत. यात बुधवारी पुन्हा एका शाळकरी मुलींचे अपहरण करून तिला मारहाण करीत अत्याचार करण्यात आला. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शहरासह जिल्ह्यातील तालुक्‍यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातील मुली व युवती शिक्षणासाठी येत असतात. नोकरी किंवा खरेदीसाठी महिलांची ये-जा असते; परंतु सध्या अनेक ठिकाणी महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्‍लासेस, मार्केट, उत्सव, यात्रा यांसह इतर ठिकाणी हे प्रकार जास्त होत आहेत. छेडछाड होऊनही महिला व मुली पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उलटसुलट प्रश्‍नांमुळे तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. यामुळे अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी सध्या बीड जिल्हा, बीड तालुका, धारूर, अंबाजोगाई, आष्टी, परळी, केज, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव, वडवणी व पाटोदा तालुका असे एकूण बारा दामिनी पथक कार्यरत आहेत. 

छेडछाडीमुळे मुलींचे शिक्षण होते बंद 
सध्या महाविद्यालयीन व शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे अनेक पालक बदनामीच्या भीतीपोटी तक्रार करीत नाही. उलट मुलींचे शिक्षण बंद केले जाते. शिक्षण बंद झाल्यामुळे व छेडछाडीच्या घटनांमुळे मुली नैराश्‍यग्रस्त होत आहेत. अत्याचार व छेडछाडीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण 60 ते 70 टक्के आहे. 
 

जिल्ह्यातील सर्वच शाळा-महाविद्यालयांत जाऊन मुली व युवतींना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. दामिनी पथकांची गस्तही वाढविण्यात आलेली आहे. महिला व मुलींची कुणी छेड काढत असेल तर दामिनी पथक किंवा संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, तत्काळ छेडछाडा करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
- हर्ष पोद्दार, 
पोलिस अधीक्षक, बीड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female insecure; 340 rapes in five years