अधिकचे पैसे दिल्याशिवाय मिळेनात खत, बियाणे !

कृष्णा पिंगळे
Sunday, 14 June 2020

सोनपेठ  (जि.परभणी) शहर व ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर मात्र राशीचे हे वाण मात्र गायब झाल्याचे पहावयास मिळत आहे. अधिकचे पैसे दिल्यानंतर मात्र हे वाण मागच्या दाराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. बियाण्यांसोबतच विशिष्ट कंपनीच्या खतालाही अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे.

सोनपेठ (जि.परभणी) :  सोनपेठ तालुक्यात हवे ते वाण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिल्याशिवाय मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
मृग नक्षत्रावर वरुण राजाने लावलेल्या दमदार हजेरी नंतर शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेले आहेत. शेतकऱ्यांनी त्यासाठी बाजारात मोठी गर्दी केलेली आहे. कृषी केंद्रावर व कृषी निविष्ठा विकणाऱ्या दुकानांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. यावर्षी लॉकडाउनने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली असली तरी शेतकरी नव्या हंगामासाठी मोठ्या उत्साहात तयार झाला आहे. सोनपेठ तालुक्यात अर्ध्या क्षेत्रफळावर कपाशीची लागवड होत आहे. तालुक्यात सध्या अनेक कंपन्यांचे विविध वाणांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. 

हेही वाचा : ‘या’ जिल्ह्यात वार्षीक सरासरीच्या ९ टक्के पाऊस
 

 राशी ६५९ या वाणांची जास्त मागणी
सोनपेठ तालुक्यातील काळ्या कसदार जमिनीसाठी अनेक कंपन्यांनी विविध वाण शिफारस केल्या आहेत. तालुक्यातील शेतकरी सध्या राशी ६५९ या वाणांची जास्त मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. सोनपेठ शहर व ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर मात्र राशीचे हे वाण मात्र गायब झाल्याचे पहावयास मिळत आहे. अधिकचे पैसे दिल्यानंतर मात्र हे वाण मागच्या दाराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. बियाण्यांसोबतच विशिष्ट कंपनीच्या खतालाही अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे.

जास्तीचे पैसे देणाऱ्यांना छुप्या पद्धतीने पोहोच
 दुकानात शेतकऱ्यांना हवा तो माल अधिकृतपणे उपलब्ध नसला तरी जास्तीचे पैसे दिल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांना हव्या त्या कंपनीचे बियाणे आणि खते उपलब्ध होत आहे. शासन एकीकडे मोठ्या प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध असल्याचे दावे करत असले तरी दुकानदार मात्र अधिकच्या पैशासाठी आपला माल दाबून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. तसेच काही दुकानदार हे आपला माल इतरत्र ठेऊन जास्तीचे पैसे देणाऱ्यांना छुप्या पद्धतीने पोहोचवत आहेत. 

हेही वाचा : प्रवेश पंधरवाड्याने शैक्षणिक सत्रास सुरवात
 

बियाण्यांचा तुटवडा
 राशीच्या बियाण्यांसाठी व सम्राटच्या खतासाठी सोनपेठ तालुक्यातील व्यापारी अधिकचे पैसे घेत आहेत. जास्त पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांना खत बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र बियाण्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. 
- महादेव भोसले, शेतकरी

 

 
कृषी विभागाकडे तक्रार करा
शेतकऱ्यांनी याबाबत अधिकचे पैसे मागणी करणाऱ्या दुकानदारांची कृषी विभागाकडे तक्रार करावी. जास्तीचे पैसे घेणाऱ्या दुकांदारावर कठोर कारवाई करण्यात येईल. दुकानदारांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
- भाऊसाहेब खरात, प्रभारी कृषी विस्तार अधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizers, seeds are sold at inflated prices Parbhani News