टुरिंग टॉकीजच्या खेळाकडे प्रेक्षकांची पाठ 

अरुण ठोंबरे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ग्रामीण भागातील जत्रेतील चित्र, चालकांना जेमतेम उत्पन्न 

केदारखेडा (जि. जालना) - ग्रामीण भागातील विविध जत्रांचे आकर्षण म्हणून ओळखली जाणारी टुरिंग टॉकीज. तेव्हा आवडत्या हिरोचे पिक्‍चर पाहण्यासाठी जागा अपुरी पडायची. आता मात्र मोबाईल फोन, इंटरनेटच्या जमान्यात नवी पिढीने तर टुरिंग टॉकीजकडे पाठ फिरविली आहे. तर जुन्याजाणत्या प्रेक्षकांच्या तुरळक हजेरीवर एखाददुसरे खेळ सुरू आहेत. 

नळणी येथील समर्थ काळू महाराज जत्रेत सध्या एकमेव टुरिंग टॉकीज आलेली आहे; मात्र कसेबसे दोन खेळ दाखविले जात आहेत. आज ग्रामीण भागात बहुतांश युवकांकडे स्मार्ट फोन आहे. ऑनलाइन चित्रपट पाहण्याची सोय झाली आहे. शिवाय शहरी भागाकडे युवकांचा ओढा आहे. साहजिकच मॉलमधील थिएटर, मल्टिप्लेक्‍समध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची अनेकांची हौस असते. परिणामी टुरिंग टॉकीजला घरघर लागल्याचे टॉकीजचालक चंद्रकांत तायडे यांनी सांगितले. 

दादांचे, धार्मिक चित्रपटांची चलती 
टुरिंग टॉकीजमध्ये आजही दादा कोंडके यांचे चित्रपट म्हणजे खणखणीत नाणेच. दादांचा चाहतावर्ग चित्रपट पाहायला येतोच. शिवाय धार्मिक चित्रपटांचीही चलती आहे. धार्मिक चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी असते. शक्‍यतो, मराठी चित्रपट दाखविण्याकडेच टुरिंग टॉकीजचालकांचा कल आहे. पूर्वी चार खेळ होत असत. आता केवळ दोनच दाखविले जातात. त्यालाही जेमतेम प्रतिसाद असतो. 

टॉकीजचे स्वरूप अजूनही तसेच 
टुरिंग टॉकिजच्या पडद्यासमोरील मोकळ्या जागेत पूर्वी सतरंजी, पोते टाकून चित्रपट पाहिला जायचा. आजही अशीच बैठक व्यवस्था आहे. पूर्वी एखादे गाजलेले गाणे सुरू झाले, की प्रेक्षक शिट्या वाजवीत, चिल्लर पडद्यावर फेकीत नाचू लागत. आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे. पूर्वी रोलच्या पेटी आणाव्या लागत, आता डिजिटल प्रोजेक्‍टरचा वापर होत आहे. 

उलाढालही घटली, रोजगारही 
टुरिंग टॉकीजचा आकार पूर्वी मोठा असायचा. दहापेक्षा अधिकजण कामाला होते; मात्र आता केवळ तीन ते चारजण कामाला आहेत. तिकीटबारीवरही चित्रपट फारसे उतरत नाहीत. कसेबसे चार ते सहा हजार रुपये दिवसाला मिळतात. यात जेवण व इतर खर्चच दोन ते तीन हजारांपर्यंत जातो. हातात केवळ एक ते तीन हजार रुपये पडतात. 

घरोघरी टीव्ही आले, सिनेमाविषयक चॅनेलची संख्या वाढली, तसेच युवकांच्या हातात स्मार्ट फोन आले, इंटरनेट उपलब्ध झाले. परिणामी ग्रामीण भागात टुरिंग टॉकीजच्या प्रेक्षकसंख्येवर मोठा परिणाम झाला. पूर्वी टुरिंग टॉकीज जत्रेच्या आकर्षणाचा विषय होता. आता राहिला नाही. उत्पन्न घटले, परिणामी टॉकीजमधून मिळणारा रोजगारही कमी झाला. 
- दिलीप तायडे, 
टॉकीजचालक, सिंदखेडराजा 
----- 
ग्रामीण भागातील अनेक मराठी कलाकार आज पुढे येत आहेत. त्यांना वाव देण्याचे कार्य होत आहे; मात्र मराठी चित्रपट अपेक्षेप्रमाणे व्यवसाय करीत नाहीत ही शोकांतिका आहे. टुरिंग टॉकीजमध्येही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार येतात. मराठी चित्रपट चालले पाहिजेत. 
- संजय देवकर, 
निर्माता  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: few audience for touring talkies