परभणीतील पंधराशेवर अतिक्रमणे महापालिकेच्या रडारवर 

PRB21B06165.jpg
PRB21B06165.jpg

परभणी ः महापालिकेची रिंगरोडवरील अतिक्रमण हटाव मोहिम तब्बल तिसऱ्या दिवशीही जोमाने सुरु होती. उघडा महादेव मंदिरापासून कॅनॉल पर्यंतचा शंभर फुटाचा रस्ता शुक्रवारी (ता.१२) मोकळा करण्यात आला. दरम्यान, शहरातील पंधराशेवरील अतिक्रमणे महापालिकेच्या रडारवर असून त्याच्या याद्या देखील तयार झाल्या आहेत. ही मोहिम देखील लगेच सुरु होण्याचे संकेत पालिका सुत्रांनी दिली. 

नागरिकांचे मोहिमेला सहकार्य 
महापालिकेने जलवाहिण्या टाकण्याच्या कारणावरून वसमत रस्त्यापासून कॅनॉलपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास बुधवारी (ता.१०) सुरुवात केली. मोहिमेस अपवाद वगळता पालिकेला फारसा विरोध झाला नाही. बहुतांश नागरिकांना या मोहिमेला सहकार्य केले. शुक्रवारी(ता.१२) सकाळी उघडा महादेव मंदिरापासून पुढे कॅनॉलपर्यंतच्या शंभर फुटाच्या रस्त्यातील अतिक्रमणे काढण्यास पालिकेने सुरुवात केली. उपायुक्त महेश गायकवाड, प्रदीप जगताप, देविदास जाधव, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, शहर अभियंता वसीमखान यांच्यासमवेत नगररचनाकार किरण फुटाणे, आर.एस. खान, रईस खान एकीकडे मोजमाप करीत असताना मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली अभियंते बालाजी सोनुले, राहुल धुतडे, हेमंत दापकेकर, नयनरत्न घुगे, शेख शादाब, श्रीकांत कुऱ्हा, श्री. जोगदंड यंत्राच्या सहायाने जागा मोकळी करीत होते. 

एकच मागणी शहरातील अतिक्रमणे काढा 
या अतिक्रमण हटाव मोहिमेत बहुतांश जणांच्या संरक्षक भिंती गेल्या, काहींचे टिनशेड गेले. नागरिकांनी स्वतःहून टिनशेड, दुकाने हलवली. परंतु या सर्वांची एकच मागणी होती, प्रशासकीय इमारत, शिवाजी नगर, डनलप रोड, ग्रॅन्ड कॉर्नर, बाजारपेठ, सरकारी दवाखाना, जिंतुर रोड, खंडोबा बाजार आदी परिसरातील अतिक्रमणे काढण्याची पालिकेने हिम्मत दाखवावी. 

शहरात अतिक्रमणांनी गाठला कळस 
शहराच्या गावठाण भागासह बाजारपेठेतील पालिकेच्या, सरकारी जागांवर प्रचंड अतिक्रमणे थाटली आहेत. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देखील पालिकेचे आयुक्त देविदास पवार यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या आहेत. उशिराने का होईना व जलवाहिण्या टाकण्याच्या निमित्ताने पालिकेने सुरु केलेली मोहिम सर्व नागरीकांना न्याय देणारी ठरावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

अतिक्रमणांची यादी महापालिकेकडे तयार 
शहरातील अतिक्रमणांची यादी महापालिकेकडे तयार आहे. आयुक्त देविदास पवार यांचा आदेश मिळताच मोहिम सुरु केली जाणार आहे. सुंदर व स्वच्छ शहरासाठी अतिक्रमणे अडथळा ठरत आहेत. नागरिकांनी देखील पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे. 
- महेश गायकवाड, उपायुक्त, मनपा परभणी. 

 
संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com