रक्ताचा तुटवडा भासला आणि ५१ तरुणांनी केले तातडीने रक्तदान

अविनाश काळे
Monday, 5 October 2020

कोरोना संसर्गाचा सहा महिन्यांचा काळ ... पन्नास व्यक्तींचा बळी आणि अनेकांनी कठीण परिस्थितीत उपचाराला सामोरे जात जीव वाचवला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाचा सहा महिन्यांचा काळ ... पन्नास व्यक्तींचा बळी आणि अनेकांनी कठीण परिस्थितीत उपचाराला सामोरे जात जीव वाचवला. कोरोनासह अनेक व्याधींनी पीडित असलेल्यांना रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर नातेवाईकांनी धावाधाव करावी लागते. त्यात शहरातील श्रीकृष्ण रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्व मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबीर सोमवारी (ता.पाच) घेऊन ५१ रक्तपिशव्यांचे संकलन केले.

दिव्यांगांचे 'भीक मागो' आंदोलन, औसा नगरपालिका घेणार का दखल?

तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे आयोजित शिबीरात तहसीलदार संजय पवार यांनी स्वतः रक्तदान करुन शिबिरास प्रारंभ केला. यावेळी हरी लवटे गुरुजी, श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉ. दामोदर पतंगे, महेश महाराज कानेगांवकर, देगलूरकर महाराज, विश्व मराठा संघाचे तालुकाध्यक्ष बाबा पवार, सागर भोसले, बाळासाहेब माने, रणजित बिराजदार, विकास जाधव, सुरज भोसले, शशिकांत भोसले, अभिषेक वडदरे, मनोज सालेगाव, कृष्णा मुळे, हरी मुळे, अनिल गायकवाड, अभिजीत शिंदे, बजरंग भोसले, अजित पाटील, शुभम सानप, स्वप्निल माने, करण आष्टगे, रघुनाथ गायकवाड, रणजीत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान लवटे महाराज यांनीही रक्तदान केले. महेश महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. पतंगे यांनी सामाजिक कार्यासाठी पुढे येणाऱ्या विश्व मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयातील चित्र

कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी मदत केली. प्रशासनही तितक्याच गतीने जनजागृती, उपाययोजनांसाठी पुढे होते. कठीण काळात अनेकांना जीवदान मिळण्यासाठी रक्त महत्त्वाचे ठरते. विश्व मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तुटवडा लक्षात घेऊन तातडीने शिबीर घेऊन रक्तदानासाठी पुढे आले. त्यांचे कौतुक करायला हवे. तरूणांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदानाची चळवळ वाढवली पाहिजे.
- संजय पवार, तहसीलदार

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty One Youths Donated Blood After Immediate Demand