डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारो भाविकांची उपस्थिती

रत्नाकर नळेगावकर
Wednesday, 2 September 2020

राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर मंगळवारी (ता.एक) रात्री सव्वा नऊ वाजता भक्तीस्थळ येथे हजारो  भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भाविकांनी महाराजांचा जयघोष करीत साश्रू नयनांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

अहमदपूर (जि.लातूर) : राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर मंगळवारी (ता.एक) रात्री सव्वा नऊ वाजता भक्तीस्थळ येथे हजारो  भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भाविकांनी महाराजांचा जयघोष करीत साश्रू नयनांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

डॉ.शिवाचार्य महाराजांच्या निधनाने ६६ वर्षांची परंपरा असलेली चापोली ते कपिलधार...

श्री.श्री.श्री.1008 भिमाशंकर लिंग महास्वामी केदारपीठ (उत्तराखंड) यांनी डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जीवनपट भाविकांसमोर मांडला. यावेळी शोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज (उदगीर), शंकरलिंग शिवाचार्य महाराज (शिरूर आनंतपाळ), शिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर ,शिवलिंग शिवाचार्य महाराज टाकळीकर यांची उपस्थिती होती. भक्तीस्थळाबाहेर जमलेल्या हजारो भाविकांनी हा अंत्यसंस्कार सोहळा सचित्र पाहण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी कुटुंबातील मठ उत्तराधिकारी अभिषेक स्वामी, राजशेखर स्वामी तसेच गुरूराज स्वामी, प्रा.विश्वांभर स्वामी, राजकुमार स्वामी यांची उपस्थिती होती.

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे

मान्यवरांची उपस्थिती

माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, पोलिस उपविभागीय अधिकारी डाॅ.अश्विनी पाटील, तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी, प्रा.मनोहर धोंडे, नागनाथ निडवदे, बब्रुवान खंदाडे, आयोध्या केंद्रे यांची उपस्थिती होती.

पोलिसांकडून मानवंदना

शासनाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असून पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून महाराजांना मानवंदना दिली. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधिक्षक डाॅ.राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, पोलिस उपविभागीय अधिकारी डाॅ.अश्विनी पाटील, तहसीलदार महेश सावंत यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. भक्तीस्थळाचा दोन किलोमीटर परीसरात पोलिस अधीक्षक,अपर पोलिस अधिक्षक, पाच पोलिस उपविभागीय अधिकारी, दहा पोलिस निरीक्षक, २२ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, १२ तुकड्या राज्य राखीव पोलिस, ४ तुकड्या व तीनशे पोलिस अशा भर भक्कम ताफ्यासह पोलिस प्रशासन सज्ज होते.

 

सकल समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्य करणारे निरपेक्ष व्यक्तिमत्त्व, साक्षात शिवआवतार असल्याचे कार्य, असे व्यक्तिमत्व मराठवाड्यात पुन्हा होने नाही. आमची मैत्री एकेचाळीस वर्षापासून होती.

- बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री.

 

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final Rituals On Shivling Shivacharya Maharaj