औरंगाबादेत होणार आईच्या दुधाची बॅंक 

योगेश पायघन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

  • रोटरी क्‍लबचे घाटीला सहकार्य 
  • पन्नास हजार डॉलरच्या प्रकल्पाचा करार 
  • रोटरीच्या मदतीने तीन महिन्यात सुरुवात 

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मराठवाड्यातील पहिली मातृदुग्धपेढी (ह्यूमन मिल्क बॅंक) सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी रोटरी क्‍लब औरंगाबाद पश्‍चिमसोबत घाटी रुग्णालयाने गुरुवारी (ता. तीन) करार केला. येत्या तीन महिन्यात नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागात ही मातृग्दुधपेढी सुरू होईल. या प्रकल्पाला कॅनडा, मलेशियाच्या रोटरीनेही मदत देऊ केली आहे. 

नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून मातृदुग्ध पेढीची घाटीत मुहुर्तमेढ रोवली जात आहे. कमी वजन, कमी दिवसचे अत्यवस्थ शिशु, अत्यवस्थ माता, मातेला दुधाची कमतरता अशा कारणांनी नवजात शिशुंना दुधाची अडचण येते. ज्या मातांना अतिरीक्त दुध स्त्रवते अशा मातांनी दान केलेले दूध मातृ दुग्धपेढीतर्फे संकलन केले जाईल.

ब्रेस्ट मिल्क पंपच्या माध्यमातून संकलित मातेचे दूध शास्त्रोक्त पध्दतीने पाश्‍चराईज्ड केले जाईल. त्याच्या मानक व सुरक्षेची खात्री झाल्यावर ते नवजात शिशुंना दिले जाईल. यासाठी नवजात शिशु विभागात दुधपेढीसाठी अत्याधुनिक प्रोसेसींग युनिट तीन महिन्यात उभारण्यात येईल. शिवाय प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुढील पाच वर्षांची हमीही रोटरी क्‍लबने घेतल्याने अखंडीत सेवा देता येईल, अशी माहिती नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. अमोल जोशी यांनी दिली. 

पन्नास हजार डॉलरचा प्रकल्प 

रोटरी क्‍लबतर्फे डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर सुहास वैद्य म्हणाले, की माता व बाल आरोग्य रोटरीच्या प्राधान्यक्रमात आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आर्थिक मदतीला तयार झालो. एकुण 50 हजार डॉलरचा हा प्रकल्प असून कॅनडातील कॅलगीरी रोटरी क्‍लबची दहा हजार डॉलर, मलेशीया रोटरीची पाच हजार डॉलर, रोटरी फाऊंडेशन 15 हजार डॉलर तर स्थानिक पाच हजार डॉलर या प्रकल्पासाठी मदत करणार आहे. तर साडेसात हजार डॉलर मदत निधी जमा करणार असून साडेसात हजार डॉलर आम्ही मदत करु, असा पन्नास हजार डॉलर म्हणजे सुमारे 35 लाखांचा हा प्रकल्प आहे. 

मातेचे दुध बाळाकरिता सर्वोत्तम आहार असतो. तुलनेत सप्लीमेंटरी फुड घेणाऱ्या बालकांतील रोगप्रतिकार शक्ती कमी दिसून येते. त्यामुळे त्यांना न्यूमोनियासारख्या आजारांना वारंवार सामोरे जावे लागते. "ह्युमन मिल्क बॅंके'च्या माध्यमातून नवजात शिशुंना सप्लीमेंटरी फुडची गरज भासणार नाही. 
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Human milk bank to start in Aurangabad