पहिली सोडली दुसरी केली, हातात पडली भलतीच बेडी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिचा विश्‍वासघात करत दुसरे लग्न करून फसवणुक केली.

नांदेड : घर घ्यायचे असल्याने माहेराहून एक लाखाची मागणी करून एका विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिचा विश्‍वासघात करत दुसरे लग्न करून फसवणुक केली. यावरुन सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहा तालुक्यातील मजरे सांगवी येथील अनुराधा (वय २०) हिचे लग्न रितिरिवाजानुसार लातूर जिल्ह्यातील सायरगाव (ता. अहमदपूर) येथील ज्ञानेश्‍वर लक्ष्मण कोटंबे याच्यासोबत ता. १५ जून २०१९ रोजी आई- वडिलांनी मोठ्या थाटामाटात लावून दिले. लग्नानंतर तिला सासरी काही दिवस चांगले नांदवले. दिपावलीनिमित्त तिला माहेरी पाठविले. त्यानंतर तिला सासरी नेऊन मुंबई येथे कामासाठी घेऊन गेले. तिथे गेल्यावर तिला दुसऱ्याच्या घरी भांडी धुणीचे काम लावले. तिचा वेळोवेळी अपमान करून तिला उपाशी ठेवत असत. मुंबई येथे घर घेण्यासाठी पतीसह त्याचे इतर नातेवाईक तिला माहेराहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावत. 

हेही वाचाScience Day : स्टार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून प्रयोग

दुसऱ्या मुलीसोबत लग्न

हा त्रास तिने आपल्या माहेरी सांगितला. परंतु सासरच्या मंडळीमध्ये काही दिवसांनी बदल होईल म्हणून ती त्रास सहन करु लागली. मात्र त्यांच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. वेळप्रसंगी पती ज्ञानेश्‍वर कोटंबे हा तिला मारहाण करत असे. लग्नानंतर म्हणजेच ता. दोन नोव्हेंबर २०१९ पासून तिचा छळ करणे सुरू केले. या त्रासाला कंटाळून तिने आपले माहेर गाठले. या दरम्यान ज्ञानेश्‍वर कोटंबे याने पहिली पत्नी असतांना तिला अंधारात ठेवून दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. हे त्याने तिला फोनवरून सांगितले. त्यानंतर तिला धक्काच बसला. 

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

लातूर महिला सहाय्य कक्षात तीने न्याय मागितला. परंतु तिला न्याय न मिळाल्याने शेवटी माळाकोळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पती ज्ञानेश्‍वर कोटंबे, सासरा लक्ष्मण कोटंबे, सासु उमाबाई कोटंबे, दीर बालाजी कोटंबे, नंदवई कमलाकर ढगे, ननंद वनिता ढगे, चुलत सासरा राम कोटंबे, चुलत सासु उषा कोटंबे, पद्मावती कोटंबे, शेषाबाई पवेकर, देविदस कोटंबे सर्व राहणार सायरगाव ता. अहमदूपर जिल्हा लातूर हल्ली मुक्काम कलीना चर्च गल्ली नं. ३, मुंबई यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ व विश्‍वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. गीते करत आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first one was released, the second was done, domesting vilance, nanded new