नांदेडच्या पहिल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 28 April 2020

शहरातील पीरबुऱ्हाणनगरातील एका ६४ व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला होता. मात्र त्याची सहा दिवसाच्या उपचारानंतर त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

नांदेड : ग्रीन झोनमधून नांदेडला शेवटच्या टप्य्यात आॅरेंज झोनमध्ये टाकणाऱ्या ‘त्या’ पीरबुऱ्हाणनगरच्या रुग्णाचा सहा दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे नांदेडला एक सुखद बातमी मिळाली असून परत त्याची तीन दिवसांनी तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. दरम्यान अबचलनगर भागातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णावर  विष्णुपीरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थीर असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. 

शहरातील पीरबुऱ्हाणनगर येथे गेल्या सहा दिवसापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडेकोट बंदोबस्त केला होता. पीरबुऱ्हाणनगरचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केल्यानंतर हा भाग पूर्ण सील करण्यात आला. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन परिश्रम घेत आहे. पीरबुऱ्हाणनगरकडे जाणारे सर्व रस्ते शहर वाहतुक शाखेच्या वतीने बंद करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी बॅरीकेटस लावले आहेत त्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

हेही वाचाहिंगोलीकरांच्या उडाल्या झोपा, कशामुळे? ते वाचाच

पीरबुऱ्हाणनगरातील रुग्णाचा कोरोना तपासणीचा दुसरा अहवाल निगेटीव्ह
 
पीरबुऱ्हाणनगरच्या कोरोना बाधित रुग्णावर विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सहा दिवसाच्या उपचारानंतर त्या रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र आणखी तीन ते चार दिवसानंतर या रुग्णांची परत कोरोना चाचणी होणार असल्याचेही डॉ. भोसीकर यांनी कळवले आहे. पीरबुऱ्हाणनगरातील रुग्णाचा कोरोना तपासणीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे. येत्या ता. ३ किंवा ५ मे रोजी रुग्णाच्या स्वाईबची चाचणी घेतली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

अबचलनगर परिसर सील

पीरबुऱ्हाणनगरचा रुग्ण उपचार घेत असतांनाच पंजाब येथून आलेल्या नांदेडच्या अबचलनगर भागात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय चालकाला कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आला. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोके दु: खी वाढली होती. परंतु प्रशासनाने यातही लक्ष घालून अबचलनगर परिसर सील केला आहे. त्या रुग्णच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांची तपासणी करून त्याना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first patient report from Nanded was negative