कोरोना इफेक्ट : बीडममध्ये पन्नास रुपयांत ३० अंडी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

शासनातर्फे अंडे, चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही. त्याबाबत जनजागृतीसुद्धा करण्यात आली. पण ग्राहकांच्या मनात बसलेली कोरोना विषाणूची धास्ती पाहता अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली. पण तीस रुपयांना कोंबडी, पन्नास रुपयांत ३० अंडी असा आश्चर्यचकित करणारा भाव मिळाल्याने नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली.

नेकनूर (जि. बीड) - महाराष्ट्रात कोरोना विषाणू दाखल झाल्यानंतर सर्वांनीच याचा धसका घेतला असून पोल्ट्री व्यवसायाचे तर यामध्ये तीनतेरा झाले आहेत. तीस रुपयांना कोंबडी, पन्नास रुपयांत ३० अंडी असा आश्चर्यचकित करणारा भाव मिळाल्याने नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

ब्रॉयलर कोंबडी खाल्ल्याने कोरोना होतो असा चुकीचा संदेश सोशल मीडियावर पसरल्यानंतर ग्राहकांनी ब्रॉयलर कोंबडी व अंडे याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्ण पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला. काही ठिकाणी फुकट तर काही ठिकाणी अत्यल्प दरात ब्रॉयलर कोंबडी व अंडी विकली जाऊ लागली. शासनातर्फे अंडे, चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही. त्याबाबत जनजागृतीसुद्धा करण्यात आली. पण ग्राहकांच्या मनात बसलेली कोरोना विषाणूची धास्ती पाहता अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली. तर चिकन व अंड्यांचे कमी झालेले भाव पाहता बऱ्याच नागरिकांनी पन्नास रुपयांत ३० अंडी व तीस रुपयाला ब्रॉयलर कोंबडी घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

चिकन दुकानावर याच कोंबडीचा भाव शंभर रुपयाला एक नग याप्रमाणे होता. पण या दुकानांवर ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री मात्र जवळपास ठप्प झाली आहे. बोकडाच्या मटनाला ग्राहक पसंती देत आहेत. पण ब्रॉयलरचे भाव कमी झाल्यानंतर ब्रॉयलर कोंबडी व अंडे खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती. एकंदरीत या कोरोना विषाणूने नागरिकांच्या मनात धास्ती बसली पण त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसायाचे मात्र कंबरडे मोडले. अनेक पोल्ट्रीचालक यामध्ये लाखो रुपयांना बुडाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Eeggs for fifty rupees