Video: पाचचा ठोका पडताच थाळीनादाने मानवंदना

file photo
file photo

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला रविवारी (ता. २२) शतप्रतिशत पाठिंबा दर्शवत शहरात गल्लोगल्ली वसाहतींतील नागरिकांनी स्वतःला तर घरातच कोंडून ठेवले. त्याचबरोबर घड्याळाचा काटा पाचवर येताच गल्लीबोळांतून, वसाहतींतून टाळ्यांचा कडकडाट, शंखनाद, थाळीनादाचे सूर घुमू लागले होते. कुठे भारत मातेचा जयघोष, तर कुठे फटाक्यांच्या आतषबाजीने कोरोना प्रतिबंधासाठी लढणाऱ्या देशातील हिरोंना नागरिकांनी मानवंदना दिली.

परभणी शहरातील नागरिकांनी रविवारी अभूतपूर्व सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. कोरोना प्रतिबंधासाठी जनता कर्फ्यूच्या शासनकर्त्यांनी केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गल्लीबोळांतील, वसाहतींतील नागरिकांनी सकाळपासूनच स्वतःला घरात कोंडून घेतले होते. अत्यावश्यक प्रसंग असला तरच काही नागरिक घराबाहेर पडताना दिसून आले. वसाहतींमध्ये तर अभूतपूर्व संचारबंदी होती. 

भारत मातेचा जयघोष
अनेक जणांनी आपले घराचे दार असो वा गेट उघडलेदेखील नाही. घरातच बसून देशभरातील परिस्थितीचा टीव्हीच्या माध्यमातून आढावा घेण्यात माहिती घेण्यात त्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसून आलं. तर पाचचा ठोका पडताच कोरोना प्रतिबंधासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या देशाच्या हिरोंना त्यांनी मानाचा मुजरा करून भारत मातेच्या जयघोषात कुठे टाळ वाजवून, तर कुठे शंखनाद, थाळीनाद करून अभिनंदन केले. यासाठी बालचिमुकले, महिला, युवा, वयोवृद्धांनी आपल्या दारात, अंगणात उभे राहून टाळी, थाळी वाजवून आपली जागरुकता, देशाप्ररतीचे प्रेम दाखवून दिले. या राष्ट्रीय आपत्तीशी एकजुटीने लढण्याचा निर्धारच केल्याचे दर्शन घडले. अनेक वसाहतींमध्ये प्रत्येक घरातून बाहेर पडणारा ध्वनी, भारत मातेचा जयघोषाच्या स्वराने परिसरदेखील दणाणून गेले होते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आपल्या हिरोंना आपापल्या परीने नागरिकांनी मानवंदना दिली.


जिंतूरमध्ये भजनसंध्या
जिंतूर (जि.परभणी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी रविवारी (ता. २२) कडकडीत बंद पाळून दिवसभर घरी बसून राहिले. सायंकाळी पाच सव्वापाचच्या सुमारास सर्वांनी आपापल्या दारासमोर येऊन, कोणी छतावर जाऊन टाळ्या, थाळ्या वाजवून व घंटानाद करून प्रशासन, वैद्यक क्षेत्रातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, तसेच पोलिस यंत्रणा यांना धन्यवाद देऊन आभार मानले. या वेळी भिविक मंडळीने रस्त्यावर येऊन भजनसंध्या साजरी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com