
हिंगोली: जुनी पेन्शन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ द्यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेने शुक्रवारपासून (ता. ३१) बंद पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांतील पाचशे कर्मचारी सहभागी झाले असून बँकांतील पाचशे कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. या वेळी कर्मचाऱ्यांनी भारतीय स्टेट बॅंकेच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत वित्तमंत्र्यांचा निषेध करीत निदर्शने केली. त्यामुळे बॅंकांत शुकशुकाट दिसून येत होता.
किमान बारा टक्के वेतनवाढ करावी, अधिकारी वर्गाचे कामाचे तास निर्धारित करावेत, कंत्राटी कर्मचारी तसेच बिझनेस करस्पॉडंट यांना नियमित कर्मचाऱ्यांएवढाच पगार द्यावा, लिव्ह बँक योजना लागू करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ ऑल बँक युनियन संघटनेच्या वतीने केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शुक्रवारी (ता. ३१) व शनिवारी (ता.एक) दोन दिवस संप पुकारला आहे.
हेही वाचा - कपालभातीमुळे आजार पळतात दूर
घोषणांनी परिसर दणाणला
हिंगोली जिल्ह्यातही जवळपास पाचशे बँक अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी भारतीय स्टेट बँकेसमोर निदर्शने करत कामकाज बंद ठेवले. या वेळी ‘वित्तमंत्री होश मे आओ, बात तो तुमसे करनी होगी’, ‘संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है’, ‘जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे’, ‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’ आशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर बँक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बँका बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बॅंकेत आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
बँकेतील कामकाज पूर्णपणे ठप्प
या आंदोलनामुळे बँकेतील कामकाज पूर्णपणे ठप्प पडले असून शुक्रवारी किमान पाचशे कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प पडणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संपात निखिल पांडे, नितीन घुगे, रुपेश राजूरकर, सुमित उंबरकर, प्रसाद काळे, शुभम मुंडे, चैतन्य जगत, विजय जायभाये, तुकाराम घ्यार, अश्विनी जायभाये, विजय अग्रवाल, अनिल दहातोंडे, संजय सातव, नितीन माने, रामराव धनवे, प्रमोद माडेवार, राकेश कुमार, जीवन जगदाळे, प्रफुल दाणी, शेखर चवरे आदी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. मागण्या मान्य न झाल्यास मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बँक युनियनने दिला आहे.
येथे क्लिक करा - व्हिडीओ- हिंगोलीत विम्याच्या पैशासाठी शेतकरी संघटनेने केली तोडफोड
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर फेरी
जिल्ह्यातील जवळपास राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या पन्नास शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बँकेतील व्यवहार बंद ठेवत शुक्रवारी निदर्शने केली. शनिवारी (ता. एक) भारतीय स्टेट मुख्य बँकेपासून सकाळी साडेदहा वाजता जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर फेरी काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले जाणार आहे.
संपामध्ये वीस बँकांचा समावेश
विविध मागण्यांसाठी देशभरात राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवस बंद पुकारल्याने बँकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, ओरियंटल बँक, सेंट्रल बँक, युको बँक, सिंधिकेट बँक, अलाहाबाद बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यासह वीस राष्ट्रीयीकृत बँका सहभागी झाल्याचे नितीन घुगे यांनी सांगितले.
कर्मचारी संपावर गेल्याने ग्राहकांची निराशा
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचारी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय संपावर गेल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची निराशा झाली. दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणाऱ्या नातेवाइकांना पैशाअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचे पाहावयास मिळाले. बॅंकेत आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने ये-जाच्या आर्थिक भूर्दंडाला सामोरे जावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.