शिपाई म्हणून काम केले तिथेच मिळाला ध्वजवंदनाचा मान

विकास गाढवे
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

महसूल विभागात याच शहरात त्यांनी शिपाई म्हणून काम केले. पदोन्नतीने ते गेल्यावर्षी नायब तहसीलदारही झाले आणि योगायोग मंगळवारी (ता. 17) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांना तहसीलदार म्हणून ध्वजवंदनाचा मान मिळाला. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे (ग्रामीण) रत्नाकर महामुनी यांच्या या प्रवासाचे सर्वांनाच अप्रूप वाटले. 

लातूर : महसूल विभागात याच शहरात त्यांनी शिपाई म्हणून काम केले. पदोन्नतीने ते गेल्यावर्षी नायब तहसीलदारही झाले आणि योगायोग मंगळवारी (ता. 17) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांना तहसीलदार म्हणून ध्वजवंदनाचा मान मिळाला. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे (ग्रामीण) रत्नाकर महामुनी यांच्या या प्रवासाचे सर्वांनाच अप्रूप वाटले. 

श्री. महामुनी यांनी वर्ष 1985 मध्ये उदगीर येथून वाणिज्य शाखेतील (बी. कॉम.) पदवी घेतली. त्यांचे वडील मुरलीधर महामुनी महसूल विभागातच पेशकार होते. पदवीनंतर महामुनी यांनी लघुलेखक व टंकलेखक परीक्षा दिल्या. वर्ष 1993 मध्ये त्यांची महसूल विभागातच शिपाई म्हणून निवड झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात त्यांनी तब्बल पाच वर्षे शिपाई म्हणून काम केले. त्या वेळी त्यांचा नियमित तहसील कार्यालयाशी संपर्क आला.

या कार्यालयात एक दिवस ध्वजवंदन करण्याचा मान मिळेल, असे त्यांना कधीही वाटले नाही. वर्ष 1998 मध्ये त्यांना लिपिकपदी, तर 2008 मध्ये पेशकार म्हणून पदोन्नती मिळाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करताना 2016 ते 2018 या काळात त्यांनी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी त्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आणि त्यांची तहसील कार्यालयात नियुक्ती झाली.

तहसीलदार अविनाश कांबळे यांची पदोन्नतीने औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार श्री. महामुनी यांच्याकडे देण्यात आला. नवीन तहसीलदारांच्या नियुक्ती रखडल्याने मंगळवारी महामुनी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महामुनी यांना मागील दिवस आठवले व गलबलून आले. 

पाटील की पवार? 
लातूरचे तहसीलदार म्हणून येण्यासाठी मागील काही महिन्यांपासून तीव्र स्पर्धा सुरू आहे. परळीचे तहसीलदार विपीन पाटील यांची या पदावर बदली झाली होती. मात्र, ते रुजू झाले नाहीत. त्यांच्यापूर्वी सौदागर तांदळे येणार असल्याची चर्चा झाली. आता या पदासाठी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी स्वप्नील पवार यांची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शिफारस केल्याचे सांगण्यात आले. तरीही अनेकांनी या पदासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flag was honored where he served as peon