तरुणाईला समृद्ध करणारे फ. मु शिंदे सध्या काय करतात?

F M Shinde and leela shinde What does now?
F M Shinde and leela shinde What does now?

औरंगाबाद : औरंगाबाद म्हटलं की, फ. मु. शिंदे यांचं वलय आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या आहेत. आजच्या तरुणांनी या जोडप्याकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. आजही या वयात ते उत्साहाने आपलं कर्तव्य बजवात आहेत. फ. मु. शिंदे आणि लीला शिंदे यांच्यासोबत संदीप काळे यांनी साधलेला संवाद 

सध्या फ. मु. शिंदे यांचे कामाचं स्वरूप कसं आहे, याबाबत बोलताना फ. मु. म्हणाले की, सध्या लेखन, वाचन सुरु आहे. मुख्यतः मी कविताच लिहितो. कविता लेखन मला स्वतःला खूप आवडत. कारण कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना कमीत-कमी शब्दांत व्यक्त करता येतात.

कुटुंब सांभाळताना सुरु असलेल्या कामाबाबत लीला शिंदे म्हणाल्या की, मुख्यतः कुटुंब पाहणे ही जबाबदारी आहेच. मात्र वेळ मिळेल तसं माझे लिखाण सुरु होते. सुरुवातीला मी प्राध्यापक असल्याने कॉलेज आणि विद्यार्थी तसेच माझ्या विषयाचा अभ्यास या व्यतिरिक्त इतर गोष्टींना कमी वेळ मिळायचा. मात्र निवृत्त झाल्यापासून मी बालसाहित्याचे काम सुरु केले आहे. माझी बालसाहित्याची जवळपास २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एका वेगळ्या पद्धतीत मी लिहीत असल्याने ते मला आवडत. याशिवाय आता निवृत्त झाल्यामुळे माझ्याकडे यासाठी पुरेसा वेळ आहे. सर देखील घरीच असतात, त्यामुळे एकंदरीत घरातलं "सर"पण हे मी सांभाळते. 

लीला शिंदे यांच्या बोलण्यावर सर म्हणाले, "गंमतीने सांगायचं तर, कवी हा नेहमीच लहान मुलासारखा असतो. त्यामुळे त्याला सांभाळणं आवश्यक असते. कधीकधी तो स्वतःला देखील सांभाळतो, मात्र स्वतःला सांभाळणं म्हणजे नक्की काय करतो, याचा तो पत्ता लागू देत नाही." लीला शिंदे यांचा खूप आधार वाटतो. त्या कर्तबगार चांगल्या लेखिका आहेत. राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या लेखनाला मिळाले आहे. 

सध्या राजकीय वातावरण आहे, सध्याच्या राजकीय पक्षातील एकूण परिस्थिती पाहता, कवी म्हणून काय वाटतं असं विचारले असता, फ. मु. शिंदे म्हणाले की, राजकीय गोष्टी उपहासात्मक मांडताना "राजकारण्यांची जय हो" हे एक पुस्तक आणलं होतं. कविता करताना काहींसाठी चिंतनाचा विषय असतो, तर काहींसाठी चिंतेचा देखील विषय असतो. त्याकडे तुम्ही कसं पाहता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 
मी एकदा निवडणूक लढवलेली आहे. माझ्या कळमेरी तालुक्यातून, त्यावेळी मला अनेकांनी विचारलं की तुम्ही एवढे प्रसिद्ध कवी आहात, मग निवडणुकीला का उभे राहिलात? त्यावेळी मी म्हणालो, आपण किती प्रसिद्ध आहोत, हे निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय कळत नाही, आणि ती प्रसिद्धी किती खरी हे पडल्याशिवाय कळत नाही..! या दोन्ही गोष्टी मी अनुभवल्या आहेत. स्वतः राजकारणावर लिहिण्यापेक्षा राजकारणाचा अनुभव घेऊन लिहिलं पाहिजे. त्याचा घोषवारा प्रत्येक कवीकडे असावा असं मला वाटत.  

लहान मुलांवर लिखाण करताना, वेगवेगळे विषय हाताळत असताना येत असलेल्या अनुभवाबद्दल लीला म्हणाल्या की, मुलांचं भावविश्व, एक तळ असते. ते समजून घ्यावे लागते. यासाठी मी वेगवेगळ्या शाळांमधून लहान मुलांशी संवाद साधत असते. त्यांच्याशी बोलते, नेमकं त्यांच्या मनात काय सुरु आहे, याचा वेध  घेण्याचा प्रयत्न  करते. अलीकडे मी औरंगाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचं भावविश्व काय आहे, हे जाणून घेत आहे. कारण शहरात मुलांना अफाट असं विश्व आहे. मात्र बहुसंख्य ग्रामीण भागातील मुले आणि शिक्षण पहिले तर ती आजही तहानलेली पाहायला मिळतात.  ग्रामीण भागातील ही मुले एवढी विलक्षण आणि हुशार आहेत, पण त्यांना समजून घेणं हे फार गरजेचं वाटत, सध्या माझा तोच प्रयत्न आहे.  मला वाटतं, बाल साहित्यिक जो असतो, त्याला जर लिहायचं असेल, तर मुलांचं भावविश्व बदलत असताना त्याला पाहावं लागते, आणि मी तो प्रयत्न करत असतो. 

गावाकडचे अनुभव सांगताना शिंदे सर म्हणाले की, आपलं बालपण ज्याठिकाणी गेलं आहे, ते ठिकाण, शाळेत शिकवणारे शिक्षक, या सर्व गोष्टी मला आजही आवर्जून आठवतात. त्या आठवणींमध्ये मी आजही रममाण होतो. त्या आठवणींचा एक धागा हा रचनांच्या मधून येत असतो. आजही मी गावाकडे गेलो, त्या परिसरात  वावरलो, तर आपण आजही लहान त्याच वयात आहोत, असा अनुभव येत असतो. "निजशैशवाज जपणे, बाणा कवीचा असणे".. असं आमच्या कवीने म्हणून ठेवलं आहे. कवी असोत किंवा आणखी कोणीही, आपलं बालपण कोणीही विसरू शकत नाही. मात्र कवींच्या बाबतीत ती तीव्रता अधिक असते. आपलं लहानपण जपणे, हा बाणा कवीचा आहे. 

आईच्या मायेबद्दल सांगताना सर पुढे म्हणाले, आईची जागा भरून काढणे अवघडच आहे. आपल्याकडे जुनी कल्पना आहे, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची आई असते. त्यामुळे माझ्या पत्नीतही आईचा अनुभव घेतो. शेवटी ती एक संवेदनशीलता असते.

एक विनोदाचा भाग सांगताना लीला म्हणाल्या की, मला किती मुलं असं विचारल्यानंतर, मी तीन मुलं म्हणते. माझी दोन मुले इतकी शहाणी आणि गोड आहेत, तर तिसरं मुलं म्हणजे फ. मु अतिशय वांड आहेत. त्याला सांभाळणे आजही मला तारेवरची कसरत वाटते. सध्या फ. मु यांचं फिरणं कमी झालं आहे. मात्र ते पूर्ण गाव घरी आणतात. मी त्यांच्यासोबत एकदिवस त्यांच्या गावी जाणार आहे. त्यांची शाळा, त्यांची नाती-गोती, त्यांचे गाव याबाबत त्यांच्या खूप आठवणी आहेत. ग्रामसंस्कृती विषयी त्यांच्या मनात इतकं प्रेम आहे की, त्याठिकाणी जायची माझी ओढ वाढली आहे.  मला याचा खूप आनंद आहे की, मी माझं आयुष्य हे ग्रामीण भागातील एका व्यक्तीसोबत जगतेय. लग्नाच्या सुरुवातीला या सर्व गोष्टी सांभाळत असताना अनेक साहित्यिक मला म्हणायचे, आमच्याकडे वीरचक्र असते तर ते आम्ही तुला दिले असते. 

लीला यांच्या बोलण्याला दुजोरा देत शिंदे म्हणाले की, वांडपणा हा कवीच्या अंगी असावाच लागतो, किंवा जो संवेदनशील असतो, त्याच्या अंगी असतोच..! मात्र त्याला लेखनातून, मनोगतातून व्यक्त करावा लागतो. माझ्यावर जसे आई-वडिलांचे संस्कार होते, त्यापेक्षा अधिक शिक्षकांचे संस्कार होते. मुळात मी घडलो ते शिक्षकांमळेच.., "माझे शिक्षक, माझी शाळा" यावर "गुरुपारायण" हे स्वतंत्र पुस्तकच लिहिलेलं आहे. यामध्ये शिक्षकांच्या सर्व आठवणी, त्यांचं व्यक्तिमत्त्व, अनुभव सगळ्यांसमोर उभे राहावेत, हाच उद्देश..! त्यातून मी कसा वाढत गेलो हे सांगताना मी असंही लिहिलं होतं की, "तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी..मास्तर, अजूनही कळत नाही, तुम्ही अस्पृश्य कसे होता?" माझी शाळा त्यावेळी महारवाड्यात होती, त्यामुळे या सर्व गोष्टी मला लिहून काढता आल्या. 

पुढे फ. मु. म्हणाले की, मी एकटाच रहायला होतो, आईवडील शिकलेले नव्हते. तालुक्याच्या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होतो. स्वतःचा स्वयंपाक करायचा, शाळेत जायचं. त्यानंतर शाळेतून आल्यावर सायंकाळी स्वयंपाक करायचा, अभ्यास करायचा, हा नियम रोजचा सुरु होता. यामध्ये पाचवी ते दहावीला वर्गात मी पहिला होतो. त्यामुळे मला जिल्हापरिषदेची स्कॉलरशिप मिळाली होती. वर्षाला मला ६० रुपये मिळायचे, ती मोठी रक्कम वाटायची. मी गणिताचा विद्यार्थी असल्याने पुढे आपण इंजिनिअर व्हावे, अशी स्वप्न होती, पण पैसे नसतील तर काय करणार? त्यामुळे मी बीएला प्रवेश घेतला. बीए केल्यानंतर एमए प्रथम श्रेणीत केलं. मी एमएचा एकमेव विद्यार्थी असेल, ज्याने परीक्षेला मूळ उत्तरपत्रिकेला एकही पुरवणी जोडली नाही.   

आपला अनुभव पुढे मांडताना लीला म्हणाल्या की, वाङ्मय वाटचालीत खरे गुरु म्हणजे गंगाधर पानतावणे सर..! जेव्हा 'जुलूस' हा पहिलासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याला पूर्ण प्रेरणा ही पानतावणे सरांची होती. त्याकाळात सगळे म्हणू लागले, एक वेगळं असे वाङ्मय जुलूसच्या निमित्ताने समोर आले आहे. सुरुवातीपासूनच आम्ही बाट मनात नव्हतो, आमचा आंतरजातीय विवाह झाला आहे. त्याकाळात केवळ दहा रुपये खर्च आमच्या लग्नाला आला. तसं पाहायला गेलं तर, परस्पर विरोधी अशी ही परिस्थिती होती, मात्र माझ्या घरातून विरोध झाला नाही. कारण माझ्या घरचे गांधीवादी होते. माझे काका गांधींसोबत होते, त्यामुळे ती एक परंपरा होती. त्यामुळे आजही आमच्याकडे जातीपाती या गोष्टी मानत नाहीत. मात्र समाजात वावरताना अनेकदा या गोष्टींचा अनुभव येतो. 

पुढे  जातीबाबत बोलताना फ. मु. म्हणाले, जातीची एक माझ्या परीने व्याख्या केली आहे, "जी जात नाही ती जात आहे.", आपण एखाद्या गोष्टीकडे कसं पाहतो, आणि कसं मांडतो, यावर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. 

आपल्या "आई" या कवितेबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, ही कविता फक्त माझ्याच आईला नाही, तर सर्वच आईंना समर्पित आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने माझ्या लक्षात आणून दिले की, "आई" हा शब्द कधी खोडून पहिला आहे का सर तुम्ही? त्यावेळी मी म्हणालो नाही.. त्यावेळी त्याने सांगितलं की, "आ" म्हणजे आत्मा, "ई" म्हणजे ईश्वर..! आत्मा आणि ईश्वराचे जिथे मिलन होते, ती "आई". त्यावेळी मी कविता लिहिली पण माझ्या डोक्यात हे आलं नाही. ही कविता सादर करताना सर म्हणाले,

आई एक नाव असतं, घरातल्या घरात गलबललेल गाव असतं,
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही.. 
आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.. 
जत्रा पांगते, पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात,
आई ही मनामनात ठेवून  जाते, अशीच काही 
जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही,
आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतील जागा 
घर उजळते तेव्हा तीच नसत भान 
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायला ही कमी पडतं रान 
पीक येतात जातात, माती मात्र व्याकुळच, 
तिची कधीच भागात नाही तहान,
दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल-खोल की,
सापडते अंत:करणातील खाण,
याहून का निराळी असते आई,
ती घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी? 
आई, खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, 
दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची माय असते, 
आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, उरतही नाही,
आई एक नाव असतं, नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेल गाव असतं
आई एक नाव असतं, आई एक नाव असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com