कोरोना साखळी तोडण्यासाठी परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू

गणेश पांडे 
Thursday, 24 September 2020

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्युचे आयोजन (ता.२६ ते ३०) सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या जनता कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना, कारखाने व इतर उद्योग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता.२४) सायंकाळी दिले.

परभणी ः जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्युचे आयोजन (ता.२६ ते ३०) सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या जनता कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना, कारखाने व इतर उद्योग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता.२४) सायंकाळी दिले.

परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तब्बल पाच हजार रुग्ण संख्येच्या दिशेने जिल्हा वाटचाल करत आहे. दिवसगणिक कमीत कमी ५० रुग्णांच्यावर रुग्ण संख्या वाढत आहे. महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रॅपीट ॲन्टीजन टेस्टच्या माध्यमातून रुग्ण शोधण्याची मोहिम शहरात राबविली जात असल्याने यातूनही दररोज रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे झपाट्याने जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा पाच हजारांचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तसेच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संख्येसोबत जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हा आकडा देखील दोनशेच्या पुढे गेला आहे. मृत्युदरात परभणी जिल्हा राज्यात आघाडीवर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या संसर्गाच्या प्रसाराला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा वेगाने काम करत आहे. परंतू, रुग्णांची वाढती संख्या ही डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आता जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर
 
कर्फ्यूमध्ये काय राहणार बंद
या जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, व्यवसाय, प्रवाशी वाहतुक करणारे खासगी वाहने, सर्व दुकानदार, छोटे मोठे बाजार लघू व कुटीर उद्योग, शासकीय, निमशासकीय सेवा यांना बंद ठेवण्यात येणार आहे. परंतू, अत्यावश्यक सेवामध्ये औषधी दुकाने, दवाखाने यांना मात्र यातून सुट असणार आहे.

हेही वाचा - नांदेड ः सर्वाधिक प्रवासी कर भरणाऱ्या ‘एसटी’ची झोळी रिकामीच

जनता कर्फ्यू संकल्पना शंभर टक्के अंमलात आणा 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार वाढलेला असतानाही नागरिकांची बेफिकरी दिसून येत आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण थांबविणे हाच आहे. हे संक्रमण थांबवायचे असेल तर जनता कर्फ्यू ही संकल्पना शंभर टक्के अंमलात आणून ती यशस्वी करावी लागणार आहे. त्यामुळे नागरीकांना अत्यावश्यक सेवा त्याच पध्दतीने दिल्या जाणार आहेत. - दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four-day public curfew in Parbhani to break corona chain, Parbhani News