औरंगाबादहून नांदेडकडे जाणारी कार पुलावरून कोसळून चार जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

जखमीवर डॉ. राम मोरे यांनी प्राथमिक उपचार करून चारही जखमींना हिंगोली येथील जिल्हा सामान्य  रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.

औंढानागनाथ (हिंगोली) : औंढानागनाथ तालुक्यातील माथा गावाजवळ औंढा ते जिंतूर मार्गावर असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन रविवारी (ता.२४) सकाळी दहाच्या सुमारास औरंगाबादवरून नांदेडकडे जाणारी कार कोसळून चौघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत माहिती अशी की, औरंगाबाद येथील काही जण नांदेड येथे पाहुण्यांकडे भेटण्यासाठी जात होते. ते कार क्रमांक एमएच २० सीएच ७५८९ ने प्रवास करीत होते. ही कार जिंतूर ते औंढा नागनाथ मार्गाने भरधाव वेगाने जात असताना कारच्या लेफ्ट साईटच्या समोरचा टायर फुटल्यामुळे गाडी माथा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून कोसळली. यामध्ये एक महिला व चार पुरुष जखमी झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जखमींमध्ये रविकांत तरटे (वय ६१),पूजा तरटे (वय ५५), कमलाकर नागोरे (वय ५०), सारंग काळे (वय ४५) व चालक नाव कळाले नाही. हे चार जण जखमी झाले असून हे सर्वजण रामनगर औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच औंढानागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजेनाथ  मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले. व त्यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीवर डॉ. राम मोरे यांनी प्राथमिक उपचार करून चारही जखमींना हिंगोली येथील जिल्हा सामान्य  रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four persons were injured when a car traveling from Aurangabad to Nanded fell off a bridge