नको असलेल्या गर्भधारणेसाठी मोफत अंतरा इंजेक्‍शन 

महेश गायकवाड
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

जालना-  कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच दुसरा सोपा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्‍शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकदा इंजेक्‍शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता महिलांना राहणार नाही.

जालना-  कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच दुसरा सोपा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्‍शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकदा इंजेक्‍शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता महिलांना राहणार नाही. 

लग्नानंतर पहिले अपत्य उशिरा हवे असल्यास किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी बऱ्याचदा महागड्या औषधांचा वापर केला जातो. मात्र, आता नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका मिळविण्यासाठी सोपा, सुरक्षित आणि उपयुक्त उपाय उपलब्ध झाला आहे. महिलांना कुटुंब नियोजन करणे अधिक सोपे करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे इंजेक्‍शन एकदा घेतल्यास तीन महिन्यांपर्यंत गर्भ राहणार नाही. जिल्ह्यासाठी बाराशे इंजेक्‍शनचा पुरवठा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला असून, सध्या वीस प्राथमिक आरोग्य केंद्रांत हे इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांत लवकरच हे इंजेक्‍शन उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

या काळात घेता येईल इंजेक्‍शन 
मासिक पाळी येण्याआधी सात दिवसांच्या आत, गर्भपातानंतर लगेच किंवा सात दिवसांच्या आत महिला हे इंजेक्‍शन घेऊ शकतात. तर स्तनपान करणाऱ्या महिला प्रसूत झाल्यानंतर 42 दिवसांनंतर हे इंजेक्‍शन घेऊ शकतात. जोपर्यंत महिलांना गर्भधारणा नको आहे तोपर्यंत दर तीन महिन्यांनी अंतरा इंजेक्‍शन घेणे आवश्‍यक आहे. इंजेक्‍शन ठरवलेल्या तारखेला घेणे योग्य असले तरी ठरलेल्या तारखेच्या 14 दिवस अगोदर किंवा 28 दिवसांनंतरही घेता येते. 

इंजेक्‍शनचे महिलांसाठी फायदे 
अंतरा इंजेक्‍शनमुळे महिलांचा रक्तक्षय व बीजांडाच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच लैंगिक संबंधावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, इंजेक्‍शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यास सात ते दहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

कुटुंब नियोजनासाठी अंतरा इंजेक्‍शन घेणे हा चांगला पर्याय आहे. सर्व शासकीय रुग्णालयांत हे इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होत नाहीत. नको असलेल्या गर्भधारणेसाठी चांगला उपाय आहे. 
- डॉ. मधुकर राठोड, 
जिल्हा शल्यचिकित्सक, जालना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free injection for unwanted pregnancy