हिंगोली येथे मोकाट जनावरांचा मुक्त संचार

राजेश दारव्हेकर
Wednesday, 19 August 2020

मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

हिंगोली :  शहरातील जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, रिसाला बाजार, नांदेड नाका आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पालिका प्रशासन जनावरांच्या मालकांना ते आवरण्याचे आवाहन करीत आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील  मुख्य रस्त्यावर ,बाजारपेठेत, वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त वावर होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरातील हिंगोली -अकोला हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठी वर्दळ सुरू असते. ऐन मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठिय्या धरून कळपच्या कळप बसत आहेत. याबाबत अनेक वेळा पालिकेकडे  निवेदन देऊन, किंवा तक्रारी देऊन ही दखल घेतली नाही. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांना दंड ठोठावला पाहिजे होता, परंतु तसे होत नाही. 

हेही वाचा संगणक संस्था, एमकेसीएल केंद्र सुरु करण्यास मुभा- डाॅ. विपीन

अपघातात किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या

त्यामुळे मोकाट जनावरे मालक मुद्दामहून आपली जनावरे रस्त्यावर सोडून देत मोकळे होत आहेत. परंतू या मोकाट जनावरमुळे अपघात होत आहेत. तर अनेक जन या अपघातात किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या असतानाही पालिका प्रशासनाला जाग का येत नाही असा सवाल नागरिकांना पडला आहे. मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात पालिका अपयशी ठरली आहे.

कोंडवाड्यात डांबून ठेऊन पशु मालकांना दंड ठोठावण्यात आला

तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मोकाट जनावरांसाठी मोहीम सुरू करून कोंडवाड्यात डांबून ठेऊन पशु मालकांना दंड ठोठावण्यात आला होता. केवळ हि मोहीम जेमतेम सहा दिवस चालली नंतर मात्र पुन्हा जैसे थे सुरु झाली.  जनावरांचा बंदोबस्त करता न आल्याने  अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. आता नूतन मुख्याधिकारी यांनी मोकाट जनावरे रस्त्यावर सोडल्यास पशु मालकावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा

शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे बसत आहेत गांधी चौकासह इतरही रस्त्यावर त्यांचा वावर वाढला आहे. यामुळे वाहनधारक देखील अडचणीत येत आहेत. आता पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकांना ही जनावरे आवरा अन्यथा फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free movement of on road pet animals at Hingoli