Ganeshotsav 2022 : यंदा विघ्नहर्त्यावरही महागाईचे विघ्न! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : यंदा विघ्नहर्त्यावरही महागाईचे विघ्न!

आष्टी : बाप्पाचे आगमन येत्या काही दिवसांत होणार आहे. त्याच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. पण, ‘जीएसटी’मुळे कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने मूर्तींचे भाव यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. एवढेच नाही तर मखर आणि इतर सजावट साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे.

बुधवारपासून गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. आष्टी शहरासह जिल्हाभरात त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील मुर्शदपूर, तसेच मुख्य बाजारपेठेत राहणाऱ्या मूर्तिकारांनी मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले आहे. आता रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली असून तीदेखील अंतिम टप्प्यात आहेत. ऑर्डरप्रमाणे मोठ्या आकाराच्या मूर्तीही तयार केल्या जात आहेत. सार्वजनिक गणेश मंडळातर्फे मूर्तीची बुकिंगही झाली आहे. मागच्या वर्षीपासून मूर्तीच्या किमतींत वाढ झाल्याचे कारागीर सांगत आहेत. पाच टक्के जीएसटीमुळे मूर्तीच्या किमती व साहित्याचे दर वाढल्याचे कारागीर सांगतात.

गेल्या वर्षी पीओपीची एक बॅग १८० रुपयांना होती. यावर्षी ती २२० रुपयांना झाली आहे. पावडरचा रंग मागच्या वर्षी ६६० रुपये किलो होता. यावर्षी ८०० रुपये किलो आहे. पेंट मागच्या वर्षी चार लीटरची कॅन १ हजार २५० रुपयांना होती. यावर्षी ती १ हजार ४०० रुपयांना आहे. थिनर एक लीटर १६० होते, यावर्षी १८० रुपयांना मिळत आहे. यंदा अडीच फूट ते साडेसात फूट उंचीच्या मूर्तीला गणेशभक्तांकडून पसंती दिली जात आहे. मात्र, मागच्या वर्षी गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्याने यावर्षी अनेक कारागिरांनी दोन फूट उंचीच्या मूर्ती केल्या आहेत. यावर्षी शिंदे-फडणवीस सरकारने मूर्तीच्या उंचीची अट शिथिल केली आहे. त्यामुळे अचानक मोठ्या मूर्तींची मागणी वाढू लागल्याने कारागिरांची चांगलीच तारंबळ उडत आहे.

गणेशाची विविध रूपे

यंदाही मूर्तिकारांनी गणेशाची विविध रूपे साकारली आहेत. यामध्ये दगडूशेठ हलवाई, लालबाग, मुंबईचा राजा, गरुडासन, अलंकार रूप, मयूरेश्वर, शंखवाले, मल्हार, तिरुपती बालाजी, फेटावाला, नागवाला, सर्पमित्र, महाराजा पॅटर्न आदी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

रंगाच्या व मातीच्या किमतींत वाढ झाली. परिणामी, मूर्तीच्या किमतींमध्ये वाढ करावी लागली. मागील एक महिन्यापासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.

-अमरनाथ पोतदार, मूर्तिकार

Web Title: Ganeshotsav 2022 Inflation Ganesh Festival Idols 25 Percent Price Rate Hike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..