दुचाकी चोरांची टोळी गजाआड; सलग दुसऱ्या दिवशी 16 दुचाकी जप्त, परभणी स्थानिक गुन्हे शाखा

गणेश पांडे
Saturday, 23 January 2021

परभणी स्थानिक गुन्हे शाखेस चोरीच्या दुचाकीची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून शोध सुरु केला.

परभणी ः पोलिसांच्या विशेष पथकाने  गुरुवारी (ता.21) 32 दुचाकी जप्त केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 16 चोरीच्या दुचाकी जप्त करून चोरच्यांची टोळी गजाआड केली आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक जयंतकुमार मीना यांनी दिली.

परभणी स्थानिक गुन्हे शाखेस चोरीच्या दुचाकीची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून शोध सुरु केला. या पथकाने आरोपी शेख इरफान शेख जलील (वय 20, रा. नुतननगर, हडको, परभणी) व त्याचा साथीदार शेख जुनैद शेख रियाज (वय 19, रा. एक नंबर आरा मशीन जवळ परभणी) या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, या दोघांनी परभणी शहरासह पूर्णा, ताडकळस, चुडावा, पालम, गंगाखेड हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.अधिक चौकशीत अजून 11 दुचाकी पालम येथील मोहमद ताहेर चाऊस (वय 23, रा. मकरकज मश्जिद जवळ, पालम) व सय्यद वली सय्यद (वय 26, टेक गल्ली, पालम) यांना विकल्याचे सांगितले.

पथकाने पालम येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या  कडील 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहायक पोलिस निरीक्षक गुलाब  बाचेवाड, फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी हनमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, अरूण पांचाळ, अझहर शेख, हरिश्चंद्र खुपसे, दिलावर पठाण, सय्यद मोबीन, रणजीत आगळे, किशोर चव्हाण, संतोष सानप, श्री. घुगे, कृष्णा शिंदे  तसेच सायबर शाखेचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, रविंद्र भुमकर, रणजीत आगळे, संतोष व्यवहारे, श्री.पोतदार यांनी मिळून केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang of two-wheeler thieves in Gajaad; For the second day in a row, 16 two-wheelers were seized from Parbhani Local Crime Branch