शहरातून सिलिंडर होणार बाद, गॅसवाहिनीचे काम लवकरच

आदित्य वाघमारे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

शहराची औद्योगिक आणि घरगुती गरज भागविण्यासाठी गॅसवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाला आगामी तीन महिन्यांत आरंभ होणार आहे. श्रीरामपूर भागातून जाणाऱ्या ‘ब्रॅंच लाइन’पासून औरंगाबादसाठी गॅसवाहिनी टाकण्याचे काम भारत गॅसची ‘भारत गॅस रिसोर्स लिमिटेड’ (बीजीआरएल) ही कंपनी करणार आहे.

औरंगाबाद - शहराची औद्योगिक आणि घरगुती गरज भागविण्यासाठी गॅसवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाला आगामी तीन महिन्यांत आरंभ होणार आहे. श्रीरामपूर भागातून जाणाऱ्या ‘ब्रॅंच लाइन’पासून औरंगाबादसाठी गॅसवाहिनी टाकण्याचे काम भारत गॅसची ‘भारत गॅस रिसोर्स लिमिटेड’ (बीजीआरएल) ही कंपनी करणार आहे. 

औरंगाबादेतील नव्या-जुन्या उद्योगांची आणि घरगुती गरज भागविण्यासाठी येणारे सिलिंडर आता आगामी दशकांत हद्दपार होण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबादसाठी १८० किलोमीटर लांबीची ही गॅसवाहिनी श्रीरामपूर येथून एका खासगी कंपनीच्या गॅसवाहिनीतून काढण्यात येणार असून त्याचा प्रवास हा शहरालगत तयार होत असलेल्या डीएमआयसीच्या शेंद्रा औद्योगिक शहरापर्यंत राहणार आहे. औरंगाबाद शहरात या माध्यमातून साडेतीन लाख जोडण्या देण्यात येणार असून, त्यासाठीचा प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.

गॅसवाहिनीला लागणार मीटर 
जलवाहिनीसारखीच ही वाहिनी शहरात टाकली जाईल. घरातील गॅस सिलिंडर यामुळे बाद होऊन गॅसवाहिनी थेट शेगडीपर्यंत नेली जाणार आहे. याला एक मीटर असून, वीजबिलाच्या धर्तीवर त्याची रीडिंग घेऊन बिले दिली जातील. वर्ष २०२६ पर्यंत हे काम औरंगाबादेत पूर्ण केले जाणार असून, शेंद्रा-बिडकीनसाठी तात्पुरती व्यवस्था आगामी वर्षभरात होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

बिडकीनमध्ये सात एकर जागा
‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’च्या शेंद्रा आणि बिडकीन येथील औद्योगिक शहरांमध्ये येणाऱ्या कारखान्यांसाठी गॅससाठा केंद्र बनविण्याची तयारी ‘बीजीआरएल’ने औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपकडे दाखवली आहे. मुख्य वाहिनी होईपर्यंत अशा पद्धतीने उद्योगांची सोय करण्याची तयारी या कंपनीची आहे. या जागेत गॅसचे केंद्र तयार करून शेंद्रा आणि बिडकीन येथे गरजांनुसार उद्योगांना पाइपद्वारे गॅस देण्याची तयारी या कंपनीने दाखवल्याने या औद्योगिक शहरांच्या बलस्थानांमध्ये भर पडणार आहे. यासाठी सात एकर जागा घेण्यावरही मुंबईतील एका बैठकीत खल झाला.

राज्यात दोन हजार कोटींचा खर्च 
राज्यातील दोन शहरांमध्ये अशाप्रकारची गॅसवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.सांगली - सातारा, नगर - औरंगाबाद या दोन गॅसवाहिन्यांच्या कामांवर दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या माध्यमातून २१०९ किलोमीटर लांबीची आणि आठ इंच व्यासाची गॅसवाहिनी टाकण्यात येणार आहे. याद्वारे १०६ सीएनजी स्टेशन्स जोडण्याचीही कंपनीची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas Cylinder Gasline work