गेवराई: एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गेवराई तालुक्याची स्थिती : शेतकऱ्यांना मदतीची आस, ४४ टक्के पंचनामे पूर्ण
गेवराई:  एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
sakal

गेवराई: तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले,ओढे, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. यामुळे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. पाळीव प्राण्यांसह मनुष्यहानी झाली. यात शेतकऱ्यांचे खरीप व फळबाग पिकांचे एक लाख आठ हजार ३८४ हेक्टरवर नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी होत आहे.

गेवराई:  एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लातूर : तीन टप्प्यांतील एफआरपीला ‘स्वाभिमानी’चा विरोध

महसूल व कृषी विभागाने नुकसान झालेल्या भागाचे सरसकट पंचनामे करण्यास सुरुवात केली असून ४४ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार सचिन खाडे व तालुका कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर यांनी सांगितले. यंदा तालुक्यातील खरिपाची पेरणी काही मंडळात योग्य वेळी झाली तर काही मंडळात उशिराने झाली होती. पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिके सुकू लागली होती.

परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले, तलाव, ओढे पूर्ण क्षमतेने भरले. मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतकऱ्यांचे उभी पिके पाण्यात गेली. यामुळे तालुक्यात खरीप व फळबाग असे एक लाख आठ हजार ३८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, मुग, कांदा या पिकांसह फळबागेचे देखील समावेश आहे. तर भेंड बुद्रूक, भेंड खुर्द, जातेगाव, बंगाली पिंपळा, शेकटा, आम्ला तसेच मारफळा येथील दोन असे एकूण आठ तलाव फुटले.

यामुळे तलावाखालील शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पंधरा जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी जीवित हानी देखील झाली. पावसाच्या पाण्यामुळे सतरा रस्ते, अठरा पूल वाहून गेले आहेत. तालुक्यात ता.५ सप्टेंबर रोजी गेवराई मंडळाक १२३.० मिमी, मादळमोही १७९.८, जातेगाव १२१.८, पाचेगाव १०५.३, धोंडराई ७८.८, उमापुर १३४.८, चकलांबा १४९.३, सिरसदेवी ११४.३, रेवकी १३८ तर तलवाडा मंडळात १४९.० मिमी सरासरी इतका पाऊस झाला आहे.

दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने महसूल व कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून ४४ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे व याद्या बनविण्याची प्रक्रिया सुरू असून याचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर करणार असल्याचे दोन्ही विभागाकडून सांगण्यात आले.

पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी सत्ताधारी व राजकीय पुढारी यांनी केली. यावेळी पीक विमा मंजूर करू व सरसकट पंचनामे करून अनुदान मिळवून देऊ असे आश्वासन शेतकऱ्यांना बांधावर देण्यात आले. परंतु विमा कंपनीकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक व गावांत न जाता होत असलेले पंचनामे याकडे सत्ताधारी व राजकीय पुढारी लक्ष देतील का? असा प्रश्न शेतकरी उपस्थितीत करीत आहेत.

ऑनलाइन तक्रार करणाऱ्यांचेच सर्वेक्षण?

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करून पीक विमा मजूर करावा अशी मागणी केली होती. यावेळी विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांचे फोटो क्रॉप इन्शुरन्स ॲपवर ७२ तासांत अपलोड करण्याच्या सूचना होत्या.

ॲप चालत नसल्याने महसूल, कृषी विभागाने ऑनलाइन व इ मेलव्दारे तक्रार नोंदवा अशा सूचना दिल्या असता अनेक शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली परंतु कंपनी सध्या ऑनलाइन तक्रार करणाऱ्यांचेच सर्वेक्षण करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी कसल्याच प्रकारची तक्रार अद्यापही केली नाही याचे काय? यामुळे तक्रारधारकांना आपला पीक विमा मंजूर होईल की नाही? असा प्रश्न पडला आहे.

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करणे महसूल व कृषी विभागाकडून सुरू आहेत. काही गावांतील पंचनामे झाले आहेत. येत्या काही दिवसांत सर्वच गावांचे पंचनामे पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण झाल्यावर तात्काळ अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. -सचिन खाडे, तहसीलदार

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मंत्र्यांचे दौरे झाले पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त निराशाच पडली. पीकविमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे पीक विमाचा आधार कमी आणि त्रास शेतकऱ्यांना जास्त होतोय. पीकविमा कंपन्या आणि शासनाची मिलीभगत आहे. हे दोघे मिळून शेतकऱ्यांचा रक्त शोषत आहेत. पंचनाम्यांची जाचक अट न लावता पीक विमा मजूर करा नसता आता शेतकरीच पीकविमा पाहणी पंचनामे करायला आलेल्या अधिकाऱ्यांना रूम्हणे दाखवतील. -पूजा मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com