पत्नीसोबतच्या संबंधाचे भूत डोक्यात शिरले, गळा आवळून एकाचा खून

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

०- एका युवकाचा गळा आवळून खून
०- मृतदेह पोत्यात भरून काकांडी शिवारात फेकले
०- एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच नातेवाईकांचा आक्रोश
०- भाग्यनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला केले अटक 

नांदेड : नुकतेच लग्न झालेल्या पत्नीसोबत अनैतीक संबंध असल्याचे भूत डोकयात शिरलेल्या एकाने आपल्याच गावातील मित्राचा गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्याचा मृतदेह चक्क एका पोत्यात भरून काकांडी (ता. नांदेड) शिवारात फेकून दिला. मात्र भाग्यनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत व सीसीटीव्ही फुटेज व सायबरचा वापर करत मुख्य आरोपीला सोमवारी (ता. नऊ) रात्री अटक केली. घटना शनिवारी (ता. सात) घडली होती. 

इस्लापूर (ता. किनवट) येथील श्रीरंग पिराजी पवार (वय ४७) हे मुलांना शिक्षण देण्यासाठी इंद्रप्रस्थ अपार्टमेन्ट नळगे कॉम्पलेक्स श्रीनगर येथे किरायाने पत्नी, मुलगा तुषार (वय १९) आणि मुलगी राहत होते. यांचा मुलगा तुषार हा शनिवारी (ता. सात) दुपारी खासगी शिकवणी घेण्यासाठी घरातून बाहेर पडला. तो सांयकाळी साडेसहापर्यंत घरी परत आला नसल्याने तुषारची आई अनुराधा यांनी त्याचे वडिल श्रीरंग पवार यांना फोनद्वारे कळविले. यानंतर श्रीरंग पवार हे लगेच इस्लापूरहून नांदेडला आले. मित्राला सोबत घेऊन मुलाचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेलसह माहिती घेतली. शहरातील काही भागात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी चार कॉल शेवटचे इस्लापूर येथील दिलीप बळीराम मिटकर याचे असल्याचे समजले. या दरम्यान त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मुलगा तुषार हरवल्याची तक्रार दिली. 

हेही वाचासुशिक्षित बेरोजगारांना फसवणारा जेरबंद

सीसीटीव्ही फुटेजचा महत्वाचा दुवा 

प्रकरणात पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे व पोलिस नाईक प्रकाश मुंडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविले. बाबानगर भागत असलेल्या सिध्दीविनायक मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमधून या प्रकरणाचा उलगडा झाला. एका दुचाकीवरून पांढऱ्या पोत्यात काही तरी घेऊन जात असल्याची दिसले. 

एकदा उघडाचनांदेडात मिलनचे ‘कल्याण’, पोलिसांकडून अड्डा उध्वस्त

पत्नीसोबत लग्नापूर्वी संबंध असल्याचा संशय

यावरून पोलिसांनी दिलीप मिटकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने तुषार पवारचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून मित्र विजय जाधव रा. घुंगराळा (ता. नायगाव) याच्या मदतीने दुचाकी (एमएच०५-बीके-३८४३) वरुन काकांडी शिवारात फेकून दिला. माझे नुकतेच लग्न झाले असून माझ्या पत्नीसोबत तुषारचे संबंध असल्याचा संशय मला होता. म्हणून मी त्याला ठार केल्याची कबुली पोलिसांना दिली. या प्रकरणात आता भाग्यनगर पोलिसांनी दिलीप मिटकर व विजय जाधव या दोघांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला  आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ghost of a relationship with his wife goes head-to-head, killing one