तरुणीचा अतिप्रसंगानेच मृत्यू, आरोपीस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

चापानेर (ता.कन्नड) शिवारात आठेगाव येथील 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू अतिप्रसंगानेच झाल्याचे उत्तरीय तपासानंतर रविवारी (ता.एक) स्पष्ट झाले. आठेगाव येथील तरुणी शुक्रवारी (ता.29) रात्री आठ वाजले तरी घरी न आल्याने आईवडील व नातेवाइकांनी शोधशोध सुरू केली होती.

चापानेर (जि.औरंगाबाद) : चापानेर (ता.कन्नड) शिवारात आठेगाव येथील 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू अतिप्रसंगानेच झाल्याचे उत्तरीय तपासानंतर रविवारी (ता.एक) स्पष्ट झाले. आठेगाव येथील तरुणी शुक्रवारी (ता.29) रात्री आठ वाजले तरी घरी न आल्याने आईवडील व नातेवाइकांनी शोधशोध सुरू केली होती. त्यानंतर त्या तरुणीचा मृतदेह शनिवारी (ता.30) पहाटे चापानेर शिवारातील गट क्रमांक 108 मध्ये सापडला होता.

याबाबत रवी राव या तरुणावर मृत तरुणीच्या कुटुंबीयांना अतिप्रसंग केल्याचा संशय घेतला होता. हा संशय खरा ठरला. आरोपीस ताब्यात घेऊन गावकऱ्यांनी व पोलिसांनी विचारपूस केली होती; मात्र त्याने काहीच माहिती नसल्याचे सांगितले होते. परंतु, उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. तेथे उत्तरीय तपासणी झाल्यावर सत्यता समोर आली आहे. त्या तरुणीवर अत्याचार झाल्यानेच मृत्यू झाला हे तपासात स्पष्ट झाले. मात्र, तरुणी अगोदर आजारीही होती. तिचा एक वॉल निकामी झाला होता आणि तिला दम्याचा त्रासही होता; परंतु तिच्यावर अत्याचार झाल्याने जास्तीचा रक्तस्राव झाला व उच्च रक्तदाब होऊन त्या तरुणीचा मृत्यू झाला, असे तपासणीत स्पष्ट झाले असे पोलिसांनी सांगितले.

कन्नड ग्रामीण पोलिसांनी रवी रामलाल राव (वय 23, रा.खालिलाबाद, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम चापानेर, ता.कन्नड) या आरोपीविरोधात शनिवारी (ता.30) रात्री गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीस रविवारी (ता.एक) न्यायालयात हजर करण्यात आले व चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. सध्या आरोपी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अटकेत असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बजरंग कुठंबरे, बिट जमादार मनोज घोडके, विजय जारवाल हे करीत आहेत. त्या तरुणीवर आठेगाव येथील स्मशानभूमीत शनिवारी (ता.30) रात्री दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरात झालेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-----

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Died Due To Rape Kannad