अखेर ॲसिड, पेट्रोल टाकून जाळलेल्या प्रेयसीचा मृत्यू; निर्दयी प्रियकराला नांदेड जिल्ह्यात बेड्या

WhatsApp Image 2020-09-03 at 11.23.32.jpeg
WhatsApp Image 2020-09-03 at 11.23.32.jpeg

नेकनूर (जि.बीड) : पुण्याहून दुचाकीने गावाकडे परतत असताना प्रियकराने वाटेतच अंगावर पेट्रोल, ॲसिड टाकून पेटवून दिलेल्या, दहा तासांहून अधिक काळ जागीच विव्हळत असलेल्या बावीस वर्षीय प्रेयसीचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 15) पहाटे मृत्यू झाला. अविनाश रामकिसन राजुरे (वय २५, रा. शेळगाव (नरसिंह- ता. देगलूर, जि. नांदेड)) असे संशयिताचे नाव असून त्याला देगलूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

देगलूर तालुक्यातील, तेलंगणा सीमेलगतच्या शेळगाव (नरसिंह) येथील तरुणी विवाहित होती. तिचे व अविनाश राजुरे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती घर सोडून अविनाशसोबत पळून गेली. वर्षभरापासून दोघे पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळीच्या बहाण्याने तिला सोबत घेऊन तो शुक्रवारी (ता.१३) पुण्याहून दुचाकीने गावी निघाला. उशीर झाल्याने येळंब (घाट, ता. बीड) परिसरातील एका खडी क्रेशरजवळ ते मुक्कामास थांबले. शनिवारी पहाटेच्या सुमारास अविनाशने प्रेयसीचा गळा दाबून तिच्या अंगावर अॅसिड, पेट्रोल ओतले. नंतर आग लावून तो पसार झाला. दुपारी नेकनूरचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्‍मण केंद्रे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी तरुणीला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबावरून सुरवातीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दहा तास विव्हळत
अविनाशने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारात प्रेयसीला ॲसिड, पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि पळ काढला. खडी क्रशरमुळे हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात आला नाही, विव्हळत असलेल्या तरुणीचा आवाज रस्त्यापर्यंत पोचत नव्हता. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना लक्षात आली. तोपर्यंत ती तेथेच विव्हळत होती.

संशयितास अटक
देगलूर ः प्रेयसीला जाळल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजून अविनाशने शेळगाव गाठले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे समजताच तो गावातून पसार झाला होता. यासंदर्भात बीड पोलिसांनी माहिती देताच देगलूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली व अविनाशला बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथील जय मल्हार ढाब्यावरून आज ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत. अविनाश राजुरेला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले. दरम्यान, ऐन दिवाळीत घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

 

तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार संतापजनक असून याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सखोल तपासासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले आहेत.
- धनंजय मुंडे, पालकमंत्री, बीड

 

ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने मन सुन्न झाले. घटना अतिशय दुर्दैवी, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून घटनेची सखोल चौकशी करावी.
- पंकजा मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव

‘मानवतेला काळिमा’
बीड जिल्ह्यात एका तरुणीला अ‍ॅसिड, पेट्रोल टाकून जाळले गेले. दीर्घकाळ ती घटनास्थळीच पडून होती आणि अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी राज्य सरकारने संशयिताविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com