
निलंगा तालुक्यात पिक नुकसानीची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
निलंगा (जि.लातूर) : वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली होती. ते आता स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मागच्या पंधरा दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा शब्द पाळावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
निलंगा तालुक्यात मागच्या पंधरा दिवसांपूर्वी निलंगा मतदारसंघात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी श्री.दानवे यांनी रविवारी (ता.चार) केली. यावेळी त्यांनी निलंगा येथील किशोर लंगोटे यांच्या शेतात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरीपाच्या सुरवातीलाच बनावट बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली आणि पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, तिळ, तूर, मूग या पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्यासमोर मांडली.
या वेळी दानवे म्हणाले की, एखाद्या भागात एका दिवशी ७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर तात्काळ प्रशासनाने अतिवृष्टीचे पंचनामे करून सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी लागते. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत. ही शोकांतिका असुन तोंड पाहून पंचनामे करण्यापेक्षा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजार समित्यातील दलाली बंद होईल, मात्र काँग्रेस, `राष्ट्रवादी`चे त्यावर लक्ष :...
राज्यमंत्री संजय बनसोडे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज द्या, असे सांगत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.दानवे म्हणाले, राज्यमंत्र्यांनी नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून घ्यावी. अर्ज देण्याची काय गरज आहे असा प्रतिप्रश्न त्यांनी राज्यमंत्र्यांना केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे सरकार संवेदनशील नाही. कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बापूराव राठोड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शेतकरी मधुकर माकणीकर आदी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर