पिकांची नुकसानभरपाई द्या, अन्यथा फिरु देणार नाही, निलंगेकरांचा इशारा

राम काळगे
Monday, 31 August 2020

खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या अन्यथा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत दिला.

निलंगा (जि.लातूर) : जगाचा पोशिंदा समजला जाणाऱ्या शेतकऱ्यांना हे सरकार सध्या वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप करून खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या अन्यथा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत दिला.

निलंगा येथील एका शेतकऱ्याशी शेतामध्ये संवाद साधत नुकसान झालेल्या मूग, उडीद व सोयाबीन पिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा कृषी अधीक्षक एस. आर. कदम, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. यावेळी पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री.निलंगेकर म्हणाले की, खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

स्वतःचा एक्स-रे काढून राज्यमंत्र्यांनी केले उद्घाटन, उदगीर कोविड रुग्णालयात...

शिवाय फळधारणेच्या काळात पावसाचा तुटवडा व रोगराई झाल्यामुळे फूलगळती झाली. फळधारणा झाली नसल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेतातील सोयाबीन पीक मजुरांद्वारे काढणेही शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. शिवाय प्रारंभीच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत व बियाणांचा तुटवडा याला सामोरे जावे लागले, अशा अडचणीच्या काळात ही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची दुबार व तिबार पेरणी केलेली आहे.

सोयाबीन पिकावरील मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लागलेल्या शेंगाची गळती मोठ्या प्रमाणात होत असून हे पीक मावा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिवळे पडले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सोयाबीन या पिकाचे तातडीने पंचनामे करून विमा कंपनीला सादर करावे असे आवाहन केले.

पत्रकारांशी संवाद साधताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, मागील सहा महिन्याच्या कोरोना संसर्गाच्या संकट काळात राज्य सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे काम केले असून कोणाचे संकट निवारण्यासाठी प्रसंगी लोकप्रतिनिधीला काही सूचनाही केल्या असतील. शासनाच्या सूचनेनुसार सहकार्याची भूमिका लोकप्रतिनीधी म्हणून कोविडच्या आपत्कालीन काळात सहकार्य करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. मात्र शेतकरी अडचणीत असताना सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार असेल तर आपण गप्प बसणार नाही.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, रेणुका, मी तुझा आता संजु काका, आईवडिलांचे छत्र...

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी संघर्षाची आंदोलनाची भूमिका करावी लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कोरोना संसर्गामुळे देश पातळीवर आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला असला तरी भविष्यकाळ शेतकऱ्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. सरकारने आजच शेतीमालाचे हमीभाव जाहीर करून ठिकाणी शेतमाल खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्याकडे जोपर्यंत माल आहे. तोपर्यंत खरेदी करण्यास सुरुवात करावी सोयाबीन पिकाला साडेचार हजार रुपयाचा हमीभाव जाहीर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आर्थिक नुकसान भरपाई द्यावे
सरकारने विमा कंपनीचे दलाल म्हणून काम न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीला आदेश द्यावे अशी मागणी करून विमा कंपनी चा अधिकाऱ्यांनी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या वस्तुस्थितीचा योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सकारात्मक भूमिकेने प्रयत्न करावे सरकार जर शेतकऱ्याचे हितसंबंध जपणारे नसेल तर यापुढील काळामध्ये शासकीय बैठकीवर बहिष्कार टाकून बैठक हॉलच्या बाहेर दारात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रशासनाच्या दारात बसून आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Compensation Of Damaged Crops, Nilangekar Warned