सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचा रोख रक्कमेसह सहा लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचा रोख रक्कमेसह सहा लाखांचा ऐवज लंपास

आपले काम आटोपून खासगी ट्रॅव्हल्स बसने घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याचा रोख रक्कमेसह सहा लाख रुपयांचा ऐवज अनोळखी व्यक्तीने लंपास केल्याची घटना औसा-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव (पाटी) (ता.औसा) येथे रविवारी (ता.२३) सकाळी घडली.

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचा रोख रक्कमेसह सहा लाखांचा ऐवज लंपास

बेलकुंड (जि.लातूर) : आपले काम आटोपून खासगी ट्रॅव्हल्स बसने घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याचा रोख रक्कमेसह सहा लाख रुपयांचा ऐवज अनोळखी व्यक्तीने लंपास केल्याची घटना औसा-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव (पाटी) (ता.औसा) येथे रविवारी (ता.२३) सकाळी घडली. या प्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोने-चांदीचे व्यापारी असलेले कोल्हापूर येथील शांतीलाल हंसाजी पुरोहित (वय 48) हे शनिवारी (ता.२२) दुपारी चार वाजता अमरावती येथून अंदाजे एकशेदहा ग्रॅम सोने - चांदीचे दागिने व रोख रक्कम चार लाख रुपये घेऊन यवतमाळहून खाजगी ट्रॅव्हल्स बसने कोल्हापूरकडे निघाले असता सदरील खासगी बस औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव पाटी येथील हॉटेल ताज येथे चहा - नाष्ट्यासाठी थांबली असता पुरोहित यांनी खाली उतरून चहा-नाष्टा उरकून ते आपल्या बसच्या सिटवर आले असता त्यांना आपली बॅगेची चैन उघडी दिसली. त्यांनी तात्काळ बॅग पाहिली असता त्यातील ऐवज व रोख रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत पोलिसांशी संपर्क केला असता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती, बिट अंमलदार बापूसाहेब मंतलवाड यांनी भेट देत येथील हॉटेल मधील सीसीटिव्हीची तपासणी केली असता यात चौघेजणांची भुमिका संशयास्पद अढळुन आली असून या सीसीटिव्हीच्या आधारे पोलिस चौघांचा शोध घेत आहे. या प्रकरणी पोलिसात शांतीलाल पुरोहित यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आली आहे.