खुशखबर...! परभणीसाठी दुसरे एक बसस्थानक मिळणार

गणेश पांडे
Friday, 5 February 2021

परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने या संदर्भात अॅड. विजयराव गव्हाणे यांनी पाठपुरावा केला होता.

परभणी ः सततची वाहतुक कोंडी, बसगाड्यांना उभे करण्यासाठी अपुरी पडणारी जागा यामुळे परभणीचे बसस्थानक प्रवाश्यांसह एसटीच्या अधिकाऱ्यांची ही डोकी दुखी बनले आहे. परंतू आता ही डोकेदुखी दुर होणार आहे. कारण परभणी शहराला दुसरे बसस्थानक मिळणार आहे. याची प्रक्रिया सुरु झाली असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी देखील याला हिरवी झेंडी दिल्याने हे बसस्थानक लवकरच गंगाखेड रस्त्यावरील एसटी महामंडळाच्या जागेत सुरु होण्याची शक्यता आहे.

परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने या संदर्भात अॅड. विजयराव गव्हाणे यांनी पाठपुरावा केला होता. या संदर्भात माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील व रामेश्वर शिंदे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. शहराची लोकसंख्या दिवसेदिवस वाढत जात आहे. त्यात शहरातील पूर्वीच्या बसस्थानकाचे बांधकाम सुरु असल्याने सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे बसस्थानक उभारण्यात आले आहे. परंतू हे बांधकाम रखडले आहे. परभणी शहरात दिवसभरात तब्बल एक हजार 500 बस गाड्या येत असतात. परिणामी वाहतुकीचा खेळखंडोबा होत असतो. यातून प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बसस्थानका शेजारीच रेल्वे स्थानक असल्याने कमालीची गर्दी या परिसरात असते. याचा ताण वाहतुक शाखेवर ही मोठा असतो. त्यामुळे ही अडचण दुर करण्यासाठी परभणीला दुसरे बसस्थानक द्यावे अशी मागणी परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी (ता.चार) जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.त्यावर हा निर्णय झाला आहे.

बसगाड्याचे विभाजन करुन वाहतुक कोंडी सुटणार गंगाखेड रस्त्यावरील बस आगाराच्या जागेवर तात्पुरते दुसरे बसस्थानक उभे केल्यास गंगाखेड मार्गे जिंतूर, पाथरी, मानवतकडे जाणाऱ्या व जिंतूर, मानवतकडून गंगाखेडच्या दिशेने जाणाऱ्या बसगाड्या जवळपास 800 बसगाड्याचे विभाजन गंगाखेड रस्तावर होईल. व उर्वरीत वसमत, हिंगोली, नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या 700 बसगाड्या या पहिल्या बसस्थानकावर येतील. परिणामी वाहतुक कोंडी सुटू शकते.

बसस्थानकाचे विभाजन झाल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही. उड्डाणपुल व शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल. रिक्षे व हातगाडे दोन ठिकाणी विभागले जातील असा आराखडा आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने एसटीच्या व्यवस्थापकी संचालकांना बोलून हा प्रश्न निकाली काढला. एसटीच्यावतीने तातडीचा निधी देखील देण्याचे आश्वासन एमडींनी दिले आहे.
- अॅड. विजय गव्हाणे, संयोजक, परभणीकर संघर्ष समिती.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The good news is that there will be another bus stand for Parbhani