'पेट्रोलवर दुष्काळी कर लाऊन सरकार जनतेची फसवणूक करतंय'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

राज्यात 'शिवस्वराज्य यात्रे'ला राज्यात सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून जनता फक्त मला बघायला येत नाही. उलट या माध्यमातून युवकांचे संघटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत आहे.​

अंबाजोगाई : भाजप-सेनेचे सरकार पेट्रोलवर दुष्काळी कर लाऊन जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) येथील सभेत केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे अंबाजोगाई येथे उत्साहात स्वागत झाले. शहरातून फेरी झाल्यानंतर येथील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत खासदार कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आशा भिसे, रेखा फड, नंदकिशोर मुंदडा यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्यात 'शिवस्वराज्य यात्रे'ला राज्यात सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून जनता फक्त मला बघायला येत नाही. उलट या माध्यमातून युवकांचे संघटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत आहे. मागील पाच वर्षातील सरकारच्या नाकर्तेपणाला विरोध करण्यासाठी युवकांची ही गर्दी होत आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बोलण्यात तथ्य नसल्याचा मुद्दा कोल्हेंनी खोडून काढला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर बोलताना दोंडाईचा येथे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गेली असता धर्मा बाबा पाटील यांच्या पत्नीला स्थानबद्ध व नजर कैदेत ठेवण्यात येते, हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. 

भाजप हा काशीचा घाट : धनंजय मुंडे
भाजप म्हणजे काशीचा घाट आहे. अनेक भ्रष्टाचारी माणसं त्यात प्रवेश करीत आहेत. भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधी त्याची चौकशीही केली का? राष्ट्रवादीत गट-तट नाही. केज विधानसभा क्षेत्रातील गावा-गावात जाऊन नमिता मुंदडा यांना विजयी करू, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government is cheating people by drought tax on petrol says MP Dr Amol Kolhe