'पंतप्रधान येत आहेत; कर्मचाऱ्यांनो मुख्यालय सोडू नका'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने उमेद अभियानांतर्गत जिल्हातील एक लाख महिलांचा मेळावा औरंगाबादला आयोजित करण्यात आला आहे.

सोयगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (ता.7) जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शनिवार) दिले. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला बचत गटांच्या महिलांना नाविन्यपूर्ण योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहे.

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने उमेद अभियानांतर्गत जिल्हातील एक लाख महिलांचा मेळावा औरंगाबादला आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंब व महिला सक्षमीकरण कामांची दखल केंद्र शासन घेणार असल्याने पंतप्रधान मोदी महिलांशी सुसंवाद साधणार आहेत.

तसेच अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहात सहभागी झालेल्या व गाव पातळीवरील कार्यकर्ते यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा उद्देश या अभियानाचा आहे. समूहात काम करणाऱ्या महिला व समुदाय संसाधन व्यक्ती यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सोयगावला पंचायत समितीच्या कक्ष अभियानाची बैठक सोयगाव पंचायत समिती तालुका कक्ष अभियानाच्या वतीने शनिवारी तालुक्यातील समूहात काम करणाऱ्या व समुदाय संसाधन व्यक्ती यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत त्यांना प्रदीप देवरे, आनंद पैठणे आदींनी मार्गदर्शन करून मेळाव्याची पूर्वतयारीबाबत चर्चा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government employees should not leave headquarters as PM is coming says Collector