Gram Panchayat Election : कळमनुरी तालुक्यात ६१५ जागेसाठी १३६० उमेदवार रिंगणात

संजय कापसे
Sunday, 10 January 2021

२६० प्रभागामधील ६१५ जागांसाठी एक हजार ३६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये १२ ग्रामपंचायतअंतर्गत विविध कारणास्तव १२ जागा रिक्त राहिल्या आहेत. २६० प्रभागामधील ६१५ जागांसाठी एक हजार ३६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात गावपातळीवर राजकारण तापले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहचली असतानाच निवडणूक होत असलेल्या गावांमधून आता चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पॅनलप्रमुख उमेदवारांनी स्वतः ची बाजू बळकट करण्याकरिता मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच मतदारांना आपल्या बाजूने वळविण्या करिता कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये गावातील मातब्बर पॅनलप्रमुख व त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत सर्वसामान्य मतदार मात्र गोंधळात सापडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उघडपणे कुठल्याही गटाला समर्थन न देता मतदारांनी शांत राहण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

हेही वाचाहिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसानीचे ११५ कोटी ९८ लक्ष रुपये मंजूर

प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात वातावरण निर्माण

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक गावात आता केलेल्या व न केलेल्या विकास कामाच्या श्रेयावरुन आरोप- प्रत्यारोपाप्रमाणेच टीका करण्याचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी युवकांनी गावाची धुरा हाती घेण्याकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरत मातब्बरांसमोर या निवडणुकीत आव्हान उभे केले आहे. त्यामुळे गावातील प्रस्थापित गाव पुढारी व नव युवकांच्या पॅनलमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत पैकी १९ ग्रामपंचायत बिनविरोध

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत पैकी १९ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. यामध्ये काही गावामधून आरक्षित असलेल्या जागेकरिता आवश्यक असलेल्या नागरिक मतदाराची संख्या नसल्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवाराचे वय कमी असल्याचे निश्चित झाल्यानंतर या जागाही रिक्त राहिल्या आहेत. निवडणूक होऊ घातलेल्या ९० ग्रामपंचायतपैकी बारा ठिकाणच्या जागा रिक्त राहणार आहेत. याबाबतचा निर्णय आता आयोगाकडून पुढील काळात घेतला जाऊ शकतो.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election: 1360 candidates in the fray for 615 seats in Kalamanuri taluka hingoli news