ग्रामपंचायत निकाल : आखाडा बाळापूर काँग्रेस; तर साळवा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

चंद्रमुनी बलखंडे
Monday, 18 January 2021

जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हणून ग्रामपंचायत म्हणून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतचे नाव आहे. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षचे गाव आहे. या ग्रामपंचायतीवर अनेकवर्ष काँग्रेसचे वर्चस्व आहे.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आखाडा बाळापूर ग्रामपंच्यायतवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखत 17 पैकी तब्बल 13 जागा मिळवत ताब्यात ठेवली आहे. तर राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली साळवा ग्रामपंचायतीवर भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. 

जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हणून ग्रामपंचायत म्हणून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतचे नाव आहे. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षचे गाव आहे. या ग्रामपंचायतीवर अनेकवर्ष काँग्रेसचे वर्चस्व आहे.  मात्र यावेळी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. त्यादृष्टीने नियोजनबद्ध तयारी केली होती. शिवसेनेने निवडणूक प्रतिष्ठची करत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार चालविला होता. तसेच शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रचार सभा लावत प्रचारात आघाडी घेतली होती. तसेच माजी उपसरपंच विजय बोंढारे, जिल्हा उपसंघटक सोपान बोंढारे यांनी प्रचाराची धुरा सांभाळत प्रचार चालविला होता. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती प्रचार चालविला.

हेही वाचानांदेड : देगाव, लोणी खुर्द, उमरीत धक्कादायक निकाल, धामदरीत भास्करराव पेरे पाटील पॅनल विजयी

जेष्ठ नेते जक्की कुरेशी, जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे, सभापती दत्ता बोंढारे यांनी प्रत्येक प्रभाग पिंजून काढला. त्यामुळे  निवडणुकीत चांगलीच रंगात आली होती. शिवसेना व काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठची केल्याने या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र , पुन्हा एकदा कॉँग्रेसने बाजी मारत 17 पैकी 13 जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. शिवसेनेला केवळ चार जागा राखण्यात यश आले. सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व राखत आपला दबदबा कायम ठेवला आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीवर 20 वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. विविध विकासकामे केल्याने जनता आमच्यासोबत होती. त्यामुळे विजय नक्कीच मिळणार होता. जनतेच्या व विकासकामांच्या जोरावर तब्बल 13 जागा मिळाल्या आहेत. हे यश जनतेचे असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी सांगितले. 

साळवा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

कळमनुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या साळवा ग्रामपंचायतीवर भाजपने एक हाती विजय मिळवला आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागोराव करंडे, भाजप अनुसूचित जाती सेलचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसभापती धम्मपाल पाईकराव यांचे साळवा हे गाव आहे. मागील निवडणुकीत संपूर्ण जागा गमवाव्या लागलेल्या नागोराव करंडे, धम्मपाल पाईकराव यांनी नियोजनबद्ध प्रचार चालविला होता. तर प्रतिस्पर्धी पॅनल प्रमुख माजी सरपंच अरुण कदम यांनीही तगडे आव्हान दिले होते. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी 9 पैकी आठ जागा जिंकत भाजपच्या श्री करंडे व श्री पाईकराव यांनी यश खेचून आणले आहे. बिनविरोध निवडून येणारी नववी जागाही भाजप कडेच राहिली असती मात्र उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ही जागा रिक्त राहिली.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Results: Akhada Balapur is under the control of Congress while Salwa Gram Panchayat is under the control of BJP hingoli news