‘या’ जिल्ह्यात हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढणार !

कैलास चव्हाण
शनिवार, 7 डिसेंबर 2019

- परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण
- सिंचन असलेल्या भागात पाणीपाळी सोडल्यानंतर पेरण्या

 

परभणी : जिल्ह्यात उशिराने सुरू झालेल्या रब्बी पेरण्यांना आता वेग आला असून आतापर्यंत एक लाख २९ हजार ८९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ४६. ५३ टक्के पेरणी झाली आहे. सिंचन असलेल्या भागात पाणीपाळी सोडल्यानंतर पेरण्या होणार आहेत.

जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या. अतिवृष्टीमुळे जमिनीत वाफसा नन्हती. तसेच शेत दुरुस्त करण्यास वेळ लागला. सततच्या पावसामुळे जमिनी चिभाड होऊन तणकटाने भरल्या होत्या. त्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करून पेरणी करावी लागत आहे. त्यासाठी उशीर लागल्याने पेरण्या उशिरा सुरू झाल्या आहेत. सध्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामातील दोन लाख ७७ हजार ३६७ हेक्टर प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ५९ हजार ७८ हेक्टर असून त्यापैकी ८७ हजार ६९९ हेक्टरवर म्हणजे ५५.१३ टक्के पेरणी झाली आहे. करडई पिकांसाठी सर्वसाधारण २५ हजार २०० हेक्टर प्रस्तावित केले असून आतापर्यंत शेतकऱ्यांनी एक हजार ५२६ हेक्टर म्हणजे ६.०६ टक्के पेरणी झाली आहे.

हरभरा, गव्हाच्या पेरा वाढणार
यंदा जमिनीत ओल चांगली असल्याने बहुतांष शेतकऱ्यांनी ज्वारी ऐवजी हरभरा पिकास पसंती दिली आहे. ज्यांना सिंचनाची सोय नाही असेही शेतकरी हरभरा पेरत आहेत. तर काहींनी सिंचनाची सोय पाहता कपाशी बाहेर काढून हरभरा पेरणी केली आहे. तर आता जायकवाडीसह अन्य प्रकल्पातून पाणी सुटणार असल्याने गव्हाचा पेरा वाढणार आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार ६४ हेक्टर असून, ३४ हजार ९५ हेक्टरवर म्हणजे ६४.२५ टक्के पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४७६ हेक्टर असून पाच हजार ८६९ हेक्टरवर म्हणजे १९.२६ टक्के पेरणी झाली आहे. कालव्यास पाणी सुटल्यानंतर गव्हाच्या पेऱ्यात वाढ होणार आहे.

 

जायकवाडी, येलदरी धरणाचा होणार लाभ
 

परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाचे ९७ हजार हेक्‍टरवर लाभक्षेत्र आहे. तसेच येलदरी धरणाचेदेखील पंधरा हजाराहून अधिक लाभ क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्यातील २२ अधिक लघूप्रकल्प देखील भरलेले आहेत. त्यामुळे जवळपास दीड लाखाहून अधिक क्षेत्र हे सिंचनाखाली आले आहे. रब्बीच्या बागायती क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. तसेच उन्हाळी हंगामात देखील पाणी मिळणार असल्याने उन्हाळी पिकाची वाढ होणार आहे. रब्बी हंगामात गहू , हरभरा आणि उन्हाळी हंगामात भुइमुग व चारा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram, wheat area to grow in 'this' district !