महाआघाडीच सरकार जास्त दिवस टिकणार नाही- पंकजा मुंडे

कृष्णा ऋषी
Friday, 27 November 2020

येथील शिक्षक कॉलनी येथे भाजपा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची बैठक झाली

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) : महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यासाठी पदवीधर मतदारांनी भाजपाच्या शिरीष बोराळकर यांनाच विजयी करण्याचे आवाहन माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २६) औंढा नागनाथ येथे सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत केले. 

 

येथील शिक्षक कॉलनी येथे भाजपा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बैठक झाली यात उपस्थित कार्यकर्ते व पदवीधर मतदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करत हे तीन तिकडे सरकार जास्त काळ टिकणार नसून जाती- पातीचे राजकारण करत मराठ्याच्या नावावर मतदान मागतात पण मराठा आरक्षणाबाबत ब्र शब्द बोलत नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकविण्यासाठी पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना नंबर एकची पसंती देत मतदान द्यावे असे आवाहन  पदवीधर मतदारांना केले.

 

यावेळी आमदार नितेश राणे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार सिमा हिरे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अँड शिवाजी जाधव, माजी नगराध्यक्ष दिपाली पाटील, नगरसेविका सीताताई नागरे, भाजपा ओबीसी कार्यकारणी सदस्य राम नागरे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर, पांडूरंग पाटील, शिवाजी पवार, नितीन कुलकर्णी, नितीन दुधगावकर, मिलिंद यंबल, श्रीकांत देशपांडे, भाजपा कामगार संघटनेचे सरचिटणीस शरद पाटील, संजय कवडे, दिलीप सांगळे, युवा नेते उद्धव नागरे, गजानन पोले,दिनकर कोकरे, के. के.शिंदे आदींची उपस्थिती होती. 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grand Alliance government will not last long - Pankaja Munde hingoli news