आजोबांच्या निधनामुळे नातीची आत्महत्या 

हबीब पठाण
गुरुवार, 25 जुलै 2019

पूजा आजोबांची फारच लाडकी होती. लहानपणापासून आजोबाच तिचा सांभाळ करत होते. अत्यंत लाडकी असल्याने पूजाला आजोबांचे निधन झाल्याचे खूप दुःख झाले होते.

पाचोड : आजोबांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमानिमित्त आलेल्या विवाहित नातीने आजोबांच्या निधनाचे दुःख अनावर झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हर्षी (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे बुधवारी (ता. 24) पहाटे उघडकीस आली. पूजा किशोर वाहुळे (वय 24, रा.हर्षी, ता.पैठण, हल्ली मुक्काम सुरत) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. 

मृत पूजाच्या आजोबांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी पूजा माहेरी हर्षी येथे पती, मुलांसह आली होती. रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते. उकाडा जाणवत असल्याने सर्व कुटुंब व नातेवाईक बाहेरच झोपी गेले व ती एकटीच घरात झोपली, तर आजी व मुलगा घराच्या बाहेरील ओट्यावर झोपले होते. सकाळी आई उठली नसल्याने मुलगा उठविण्यासाठी गेला असता, त्याला आई पूजा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्याने आरडाओरड केल्यानंतर आजी घरात आली. तिने समोरील दृश्‍य पाहिल्यानंतर हंबरडा फोडला.

या घटनेमुळे वाहुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे पूजा आजोबांची फारच लाडकी होती. लहानपणापासून आजोबाच तिचा सांभाळ करत होते. अत्यंत लाडकी असल्याने पूजाला आजोबांचे निधन झाल्याचे खूप दुःख झाले होते.

पोलिस सूत्रांनी सांगितले, की आजोबांचे दुःख अनावर झाल्याने तिची मानसिक स्थिती बिघडली म्हणून तिने टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली असावी. या घटनेची पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजाच्या पश्‍चात पती, एक चार व अडीच वर्षांचा मुलगा आहे. तिच्या मृत्यूने हर्षी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास जमादार सुधाकर मोहिते करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: granddaughter commits suicide after death of grand father