मराठवाड्याच्या भुमिपुत्राकडून परभणीला मोठ्या अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मुळचे नांदेड जिल्ह्यातील परंतु शिक्षणासाठी शहरात अनेक वर्ष वास्तव्य केलेले देविदास पवार हे नुकतेच महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत. तसे पाहिले तर नांदेड व लातुरकरांनी परभणीला फारसे काही दिलेले नाही. परंतु श्री. पवार यांचे शिक्षण येथे झाल्यामुळे व त्यांनी तशा भावना व्यक्त केल्यामुळे त्यांच्याकडून परभणीकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

परभणी ः याच शहरात माझे अकरावीपासून पदव्युत्तर शिक्षण झाले. त्या काळात पालिकेने असे करावे, तसे केले पाहिजे, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत असतं. परंतु, ते प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली आहे व ते प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करील, मी देखील मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे, असे उद्गार महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी विभागप्रमुखांनी आयोजित केलेल्या स्वागताच्या प्रसंगी काढले होते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याकडून अनेक योजना मार्गी लागण्याच्या अपेक्षा आहेत.

शहरात विकासाचा मोठा बॅकलॉग
साडेसात वर्षापुर्वी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे पाहून परभणीकरांना देखील सर्वकाही मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु त्याचा भ्रमनिरास झाला. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य अशा मुलभूत, पायाभूत सोयीसुविधांचा बॅकलॉग अजूनही शिल्लकच आहे. मराठवाड्यातील पालिकांकडून चांगले प्रस्ताव येत नसल्यामुळे निधी मिळत नाही, असे श्री.पवार म्हणाले होते. त्यांनी राज्याच्या नगरविकास मंत्रालयात काम केले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगले प्रस्ताव दाखल करण्याची व शहरातील या सेवा सक्षम करण्याची चांगली संधी आहे.

रखडलेल्या योजना, प्रकल्पांना गतीची गरज
शहरात युआयडीएसएसएमटी, अमृत या नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत. परंतु, वितरण व्यवस्थेवरील नळजोडण्यांचा प्रश्न कायम आहे. गेल्या सहा महिण्यापासून नळजोडण्यांना अपेक्षीत गती मिळालेली नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी श्री.पवार यांना यंत्रणेतील दोष दुर करून व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागले. शहरात स्वच्छतेचा प्रश्न देखील कायम आहे. बोरवंड येथे पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वर्षभरापुर्वी सुरु होणार होता. १८ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. परंतु, तो अजूनही पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित झालेला नाही. त्यातील दोष दुर करण्याचे काम करावे लागेल. धार रोडवरील डंपींग ग्राऊंड हलवण्याचे काम देखील दोन वर्षापासून रखडलेलेच आहे. कोट्यावधी रुपये खर्च झाले, परंतु शहरातील शिवाजी उद्यान, नेहरू उद्यानांची कामे वर्षानुवर्षापासून रखडलेली आहे. त्याच्या कारणांचा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षीत आहे.शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते शाही मशिद रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरुच आहे. असेच शहरातील अनेक विकास कामे अतिशय संथगतीने सुरु आहेत. 

हेही वाचा - Video -  मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी

डबघाईत गेलेल्या पालिकेला उत्पन्नाच्या स्त्रोताची गरज
परभणी पालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली आहे. पालिका आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देखील देऊ शकत नाही. त्यामुळे तेथे आहे त्या उत्पन्नाच्या स्त्रोतांना बळकटी देऊन नवीन स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. उत्पन्नाचा पालिकेचा एकमेव स्त्रोत म्हणजे मालमत्ता, पाणी कर. परंतु त्याची जवळपास ८० कोटींची थकबाकी आहे. ही वसुल करण्याचे मोठे आव्हाण श्री. पवार यांच्यापुढे आहे. तसेच शहरातील पालिकेच्या इमारती, गाळे यांची वसुली गेल्या तीन-चार वर्षापासून बंद आहे. त्या झारीत अडकलेल्या शुक्राचाऱ्यांना बाहेर काढून त्या स्त्रोताला बळकटी देणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - उमेदमुळे तीच्या कर्तृत्वाला मिळाली लॉकडाऊनमध्ये भरारी

अधिकाऱ्यांचा बॅकलॉग भरून काढणे आवश्यक
महापालिकेत अपर आयुक्त, उपायुक्त, अभियंते, शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सहायक आयुक्त, असे प्रमुख सर्वच्या सर्व पदे रिक्त आहेत. या महत्वाच्या सर्व पदांचा पदभार कंत्राटी अथवा कनिष्ठ वर्गातील कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यामुळे पालिकेच्या कुठल्याच विकास कामाला गतीमानता नाही. पदांवर सक्षम अधिकारी आणण्याचे काम जर त्यांनी केले तर रखडलेल्या कामांसह प्रशासकीय कामकाजाला गती येईल तसेच पारदर्शकता देखील निर्माण होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great Expectations From Bhumiputra Of Marathwada To Parbhani, parbhani news