esakal | शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर ..
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी शहरात शिवजयंतीनिमित्त बुधवारी (ता.१९) सकाळपासून शहरात भगवे फेटेधारी युवक दुचाकी, सायकलवरुन पुतळ्याकडे येत होते. सकाळपासून महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रांग लागली आहे. 

शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर ..

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : प्रौढ प्रतापपुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रीय कुलवंतस् , सिंहासनाधीश्वर,महाराजाधिराज, महाराज श्रीमंत श्रीश्रीश्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा गगणभेदी घोषणा देत परभणी शहरात सर्वस्तरातील नागरिक छत्रपती शिवरायांना जयंत्तीनिमित्त बुधवारी (ता.१९) अभिवादन करत आहेत. पहाटेपासून छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला आहे.
मागील महिनाभरांपासून शहरात शिवजयंती उत्सवाची तयारी सुरु होती. त्यानिमित्त आठ दिवसांपासून शहर भगवेमय झाले आहे. बुधवारी सकाळपासून शिवजयंतीचा उत्साह अभूतपूर्व, असा राहीला आहे. सकाळपासून शहरात भगवे फेटेधारी युवक
दुचाकी, सायकलवरुन पुतळ्याकडे येत होते. सकाळपासून महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रांग लागली आहे. महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, महापालिका आयुक्त रमेश पवार, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्यावतीने डॉ. केदार खटिंग, डॉ. रामेश्वर नाईक, आमदार डॉ. राहूल पाटील, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी अभिवादन केले.

हेही वाचा - बालिकेवर अत्याचार करुन ठार मारणाऱ्यास फाशीची शिक्षा ...

प्रभातफेरीने लक्ष वेधले
परभणी शहरातील विविध भागातून महिला आणि पुरुषांनी खास वेषभुषेत प्रभातफेरी काढली. दत्तधाम परिसरातील रहिवाशांनी सकाळी नऊ वाजता दत्तधाम ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशी चार किलोमिटर अंतराची प्रभातफेरी काढली. यामध्ये  महिलांनी मोठा सहभाग घेतला. केशरी रंगाच्या साड्या आणि डोक्यावर भगवे फेटे अशा वेशभुषेत महिला मोठ्या उत्साहात सहभागी  झाले होते. तसेच पुरुषांनी खासवेषभुषा आणि फेटे घालत यात सहबाग घेतला. हातात भगवे झेंडे घेऊन लहान मुलांचाही उत्साह पाहयला मिळाला. त्यासोबतच शिवशक्ती बिल्डींग परिसरातील नागरिकांनीदेखील अशाच प्रकारे प्रभातफेरी काढुन अभिवादन केले.

आरएसएस, समता सैनिक दलाने केले संचलन
येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखेने संघ कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान, पथसंचलन केले. तसेच समता सैनिकक दलाने पथसंचलन करत महाराजांना अभिवादन केले. राहुल नगर येथून पथसंचलन सुरु झाले होते. दोन्ही  पथसंचलनाने लक्ष वेधुन घेतले होते.

हेही वाचा - ...चक्क स्मशानभूमीत व्यायाम !

रांगोळीने लक्ष वेधले
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात प्रमोद उबाळे, योगेश मगर, ज्ञानेश्वर बर्वे या तरुणांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा रांगोळीतून साकारल्या आहेत. अत्यंत मनमोहक अशा हुबेहुब रांगोळीतून त्यांनी अभिवादन केले आहे. त्यांनी जीवन कौशल्य या टिमच्या नावाने रांगोळी साकारल्या आहेत.

सायंकाळी निघणार भव्य मिरवणुक
परभणी शहरात एक शहर एक जयंती अंतर्गत सार्वनजीक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने बुधवारी (ता.19) शिवजयंती महोत्सवानिमित्त मुख्य मिरवणुक निघणार आहे. शनिवार बाजार मैदानावरुन सायंकाळी सहा वाजता मिरवणुकाला प्रारंभ होणार आहे. अश्वावर स्वार फेटेधारी महिला, लेझीम, ढोलताशा पथक, वासुदेव, गोंधळी, झांज पथक आदींची सहभाग असणार आहे. ही मिरवणुक मुख्य बाजारपेठ मार्गे रात्री उशीरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ विसावणार आहे.