भुईमुगाच्या शेंगाची काढणी सुरू 

लक्ष्मीकांत कुलकर्णी 
Saturday, 9 May 2020

यावर्षी परतीच्या पावसाने विहिरी, कूपनलिकांना चांगले पाणी आहे, गोदावरी बंधाऱ्यासह जायकवाडी डाव्या कालव्यालाही पाणी आहे. या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली आहे.

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  यावर्षी परतीच्या पावसाने मोठ्याप्रमाणात जलसाठा वाढला. त्याचप्रमाणे जायकवाडीचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाच्या पिकाची पेरणी केली आहे. सध्या काही ठिकाणी भुईमुगाच्या शेंगाची काढणी सुरू आहे. 

गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ होता. यामुळे उन्हाळ्यात पाणी नव्हते तर दुसरीकडे डुकरामुळे अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीकडे पाठ फिरवली होती. यावर्षी परतीच्या पावसाने विहिरी, कूपनलिकांना चांगले पाणी आहे, गोदावरी बंधाऱ्यासह जायकवाडी डाव्या कालव्यालाही पाणी आहे. या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली आहे.

हेही वाचा :  जालन्यातील शेतकऱ्यांना घरपोच खते 

उन्हाळी भुईमुगाचे उत्पन्न खरीप हंगामाच्या चारपट जास्त निघते, यातून मोठा फायदा होतो तर शेंगालाही मोठी मागणी असते, असे शेतकरी सांगतात. काही शेतकरी घरी मशीन आणून शेंगा फोडून बाजारात शेंगदाणे विकतात तर ग्रामीण भागात अनेक लोक शेंगाची खरेदी करतात. भुईमूग पेरल्यानंतर जंगली प्राणी पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान करतात. यामुळे पिकांना तार कंपाऊंड, बोरीच्या काट्याचे कंपाऊंड तर कधीकधी राखणही राहावे लागते.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

राजूरकर कोठा येथील शेतकरी राधाकिसन ओझा यांनी दीड एकरमध्ये भुईमुगाची पेरणी केली आहे. त्यांच्या शेतात भुईमुगाची काढणी सुरू आहे. ४० किलो बियाणे पेरले होते, यातून दहा क्विंटल शेंगाचे उत्पन्न हाती आले. ५० रुपये किलोने शेंगा विकल्या जातात. भुईमुगाच्या काढणीच्या वेळेला भुईमुगाचे वेल उपटून वेलाच्या शेंगा तोडाव्या लागतात, तोडलेल्या शेंगाची १६ वी वाटणी मजुरांना द्यावी लागते. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाणी नसल्याने उन्हाळी भुईमुगाचे पीक घेता येत नव्हते. यावर्षी परतीच्या पावसाने व डाव्या कालव्याला पाणी असल्याने भुईमुगाची पेरणी केली. अवघ्या चार महिन्यांत या पिकापासून चांगले उत्पन्न मिळते. शिवाय भुईमूग काढायला मजुरांची अडचण येत नाही, मजूर लगेच उपलब्ध होतात. शेंगाला भावही चांगला मिळतो. 
- राधाकिसन ओझा, 
शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groundnut harvesting begins