
पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले, मराठवाड्यात बीड नंतर सर्वात जास्त राष्ट्रवादी पक्षाच्या ग्रामपंचायत निवडून आणणारा परभणी हा जिल्हा आहे.
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद वाढली असल्याचे दिसून आले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सन्मान स्विकारताना आपल्यावरील जबाबदाऱ्याही वाढल्या असून लोकांची कामे करण्यासाठी यापुढे प्राधान्य द्यावे लागेल, असे आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी (ता.24) केले.
जिल्ह्यात पक्ष बांधणीकरिता आणि पक्ष संघटन मजबूत व्हावे, याकरिता परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता.24) पक्ष पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परभणी पालकमंत्री नवाब मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार डॉ. फौजिया खान, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, परभणी शहरजिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, भावना नखाते, किरण तळेकर, रितेश काळे, सुमंत वाघ, नंदा राठोड, संदीप माटेगावकर, कृष्णा कटारे, दत्ता मायंदळे, दीपक वारकरी आदी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले, मराठवाड्यात बीड नंतर सर्वात जास्त राष्ट्रवादी पक्षाच्या ग्रामपंचायत निवडून आणणारा परभणी हा जिल्हा आहे. याठिकाणी 566 पैकी 235 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी विजय झाले असून जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा ठरला आहे. पर्यायाने पक्षाकडून जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत उपलब्ध असेल. परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा हा लवकरच सकारात्मकतेने मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस परभणी जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन संदीप माटेगावकर यांनी केले तर आभार सुमंत वाघ यांनी मानले.