esakal | परभणीत तीन तर पाथरीत दहा लाखांचा गुटखा जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

PRB20A04055

परभणी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवाईत एकूण १३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये परभणीत तीन तर पाथरीत दहा लाखाचा माल जप्त केला.

परभणीत तीन तर पाथरीत दहा लाखांचा गुटखा जप्त 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः पोलिसांनी कारमधून तीन लाखांचा गुटखा सोमवारी (ता.नऊ) रात्री दहाच्या सुमारास जप्त केला. तीन संशयितांना अटक केली. वसमत रोडवर, एमआयडीसीसमोर पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता तीन लाख तीन हजार सहाशे रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा आढळला. या साठ्यासह कार पोलिसांनी जप्त केली. नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फौजदार अजय पाटील तपास करीत आहेत. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पदरित्या थांबलेल्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात दहा लाख ८० हजाराचा गुटखा आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता.दहा) पहाटे चार वाजता पाथरी शहरालगत असलेल्या कारखाना परिसरात घडली.  

विशेष पथकाने वाळुची चोरटी वाहतूक करणारे तीन वाहने पकडली 
पूर्णाः पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अवैध धंद्याविरोधात आठ दिवसांत दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली. सोमवारी (ता.नऊ) पूर्णा ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर व ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहाटी नदी पात्रातून वाळुची चोरटी वाहतूक करणारे तीन वाहने पकडली. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध वाळु उपसा थांबवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तहसिलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी याची दखल घेऊन गुरुवारी (ता.पाच) मध्यरात्री पिंपळगाव बाळापूर शिवारातील पुर्णा नदीपात्रात विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार यांनी वाळुची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा मंगळवारी (ता.दहा) पहाटे चार वाजता फौजदार चंद्रकांत पवार व विश्वास खोले, हवालदार सुग्रीव केन्द्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, दिपक मोदीराज, राहुल चिंचाणे यांच्या पथकाने सापळा रचून लक्ष्मीनगर शिवारात वाळु वाहतूक करणारे टिप्पर पकडले. सदरील प्रकरणात पुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर ताडकळस पोलिसांच्या हद्दीत राहटी नदीपात्रात वाळू उपसा करुन काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेले दोन टिप्पर ताब्यात घेतले आहे. यातील दोन आरोपी विरोधात ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - नांदेड : कापूस उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीमध्ये अडचणीत
 

जिंतूरला दुकान फोडून दहा लाखांचे मोबाईल लंपास 
जिंतूर ः शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विठ्ठल मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून चोरट्याने विविध कंपन्यांचे सिल पॅक दहा लाखांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता.दहा) रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. विठ्ठलदास पोरवाल यांच्या मालकीचे विठ्ठल मोबाईल शॉपी हे शहरातील मुख्य रस्त्यावर आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील सॅमसंग, विवो, ओप्पो, वन प्लस, रेडमी यासह इतर कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरून नेले. सकाळी मॉर्निग वॉकसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी दुकान मालक पुरुषोत्तम पोरवाल यांना दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले असता त्याने तेथून जवळ असलेल्या अर्बन बँकेच्या जुन्या मुख्यालयापर्यंत त्याचा माग काढला व त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले. दिवाळीच्या काळामध्ये विक्रीच्या उद्देशाने आलेले मोबाईल चोरीला गेल्याने पोरवाल कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना गजाआड करावे, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी केली. 
  

हेही वाचा - नांदेडला मंगळवारी ५८ कोरोनामुक्त; ३४ पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू
 


पाथरीत दहा लाख ८० हजारांचा गुटखा जप्‍त 
पाथरी ः रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पदरित्या थांबलेल्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात दहा लाख ८० हजाराचा गुटखा आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता.दहा) पहाटे चार वाजता पाथरी शहरालगत असलेल्या कारखाना परिसरात घडली. पोलिसांनी गुटखा जप्त करुन गुन्हा दाखल केला. कर्मचारी धनंजय शिंदे, अमोल मुंढे, होमगार्ड कृष्णा नागरगोजे हे रोजच्याप्रमाणे शहरात रात्रीच्या गस्तीवर असताना पहाटे चारच्या सुमारास पाथरी -सेलू रस्त्यावर साखर कारखाना परिसरात एक टेम्पो संशयास्पदरित्या उभा असलेला आढळला. पोलिस पथकाने टेम्पो जवळ जाऊन चालकास चौकशी टेम्पोत काय आहे, कुठे चाललात याबाबत चौकशी केली असता चालक उडवाउडवीची उत्तरे देत गोंधळलेल्या अवस्थेत दिसल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता टेम्पोत एकूण ३० गोण्यात गुटखा आढळला. ज्याची किंमत दहा लाख ८० हजार इतकी आहे. पथकाने टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी धनंजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन ः राजन मंगरुळकर