हज यात्रेचा कोटा वाढला 

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - हजला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर असून, सौदी प्रशासनाने मागील तीन वर्षांपासून कपात केलेला वीस टक्‍क्‍यांचा कोटा या वर्षीपासून पूर्ववत केला आहे, त्यामुळे देशभरातून एक लाख 70 हजार भाविकांना हजला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटा कपातीने मागील तीन वर्षांपासून देशातून फक्त एक लाख 25 हजार भाविकांनाच हजला जाण्याची संधी मिळत होती. वाढीव कोट्यामुळे महाराष्ट्रातून आता सात हजारांऐवजी साडेनऊ हजार भाविकांना हजला जाण्याची संधी मिळेल. या वर्षी 25 जुलै ते 26 ऑगस्टदरम्यान देशभरातून भाविक सौदीतील मक्का येथे जाणार आहेत. 

सर्वच राज्यांना फायदा 
सौदी प्रशासनाच्या नियमानुसार एक हजार मुस्लिमांच्या मागे एका व्यक्तीला हजसाठी व्हिसा दिला जातो. त्यानुसार भारतासाठी एक लाख 70 हजारांचा कोटा आहे. त्यामध्ये एक लाख 15 हजारांचा कोटा केंद्रीय हज समितीला, तर 45 हजारांचा कोटा हा खासगी पर्यटक संस्थेच्या चालकांना मिळत होता; मात्र मक्का येथील हरम शरीफचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन वर्षांपासून सौदी प्रशासनाने जगभरातील सर्वच देशांचा कोटा वीस टक्‍क्‍यांनी कमी केला होता. त्याचा फटका भारतातील भाविकांना बसला व कोटा एक लाख 36 हजारांवर आला. मागील तीन वर्षांपासून कपात कायम असल्याने अनेकांची हजला जाण्याची संधी हुकली होती; मात्र यंदा पुन्हा एक लाख 70 हजारांचा कोटा मिळाल्याने सर्वच राज्यांना फायदा झाला आहे. मागील वर्षी महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत सात हजार भाविक हजला गेले होते. आता कोट्यामध्ये वाढ झाल्याने साडेनऊ हजारांच्या जवळपास भाविकांना हजला जाण्याची संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

25 जुलैपासून जातील भाविक 
केंद्रीय हज समितीने तयार केलेल्या आराखड्यानुसार देशात 25 जुलै 26 ऑगस्टदरम्यान भाविक हज यात्रेला जाणार आहेत. मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील भाविक हे ऑगस्टमधील दुसऱ्या आठवड्यापासून जाण्याची शक्‍यता आहे. या वर्षी मक्का येथे हज हे 30 ऑगस्ट रोजी सुरू होईल. 31 ऑगस्ट रोजी भाविक हे अराफतच्या मैदानात असतील. हज यात्रा झाल्यानंतर भाविकांचा 7 सप्टेंबर 2017 पासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. 

सोडती 14 ते 21 मार्चदरम्यान 
मागील वर्षी महाराष्ट्रातून जवळपास 55 हजार भाविकांनी अर्ज केले होते. आता या वर्षी आलेल्या अर्जांतून देशभरातील विविध राज्यांच्या हज समिती कार्यालयात 14 ते 21 मार्च या कालावधीत सोडत काढली जाणार आहे. यामध्ये 70 वर्षे पूर्ण असलेल्या भाविकांना त्याच्यासोबत एका व्यक्तीचा थेट हज यात्रेसाठी क्रमांक लागेल. ज्यांनी सलग पाचव्या वर्षी अर्ज केला आहे, त्यांचासुद्धा थेट क्रमांक लागणार आहे, तर सलग चौथ्या वर्षी अर्ज करणाऱ्या भाविकांमधून; तसेच सर्वसाधारण भाविकांतून सोडत होण्याची शक्‍यता आहे. 

हज यात्रेला भाविक 25 जुलै ते 26 ऑगस्टदरम्यान जाण्याची शक्‍यता आहे. सोडतीनंतर हजची स्थिती स्पष्ट होईल. 
- करीम पटेल, अध्यक्ष खिदमाते हुज्जाज समिती, औरंगाबाद

Web Title: Hajj pilgrimage quota increase