परभणीचा तरुण शरीराने दिव्यांग, पण मनाने अभंग

गणेश पांडे
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

गुरु चक्क पदवीधारक आहे. आणि त्याने औरंगाबाद शहरात राहून स्पर्धा परीक्षाही दिल्या आहेत. प्री परीक्षा पास झाल्यानंतर मेनला त्याला यश आले नाही. आपण दिव्यांग आहोत काय करावे हा विचारही गुरुसिंहच्या मनाला कधी शिवला नाही. या गड्याने हार न मानता परभणीत येऊन सरळ चहाचा व्यवसाय सुरु केला.

परभणी : बेरोजगारीचे भुत आजकाल सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. शिक्षण घेवूनही रोजगार मिळत नसल्याची ओरड तरूणांमधून होतांना दिसते. परंतू परभणीतील गुरुसिंह चंदेल या दिव्यांग युवकाने नोकरीच्या मागे न लागता पदवीनंतर सरळ स्वताचा चहाचा व्यवसाय सुरु केला आहे. गुरुचा चहा काही साधा-सुधा नाही तर तो गावराण गुळाचा चहा आहे. गुरुसिंहने दिव्यांगावर केलेली मात व त्यांचा चहा हा परभणीत चर्चेचा विषय आहे.

गुळाच्या चहाचा गोडवा

परभणी शहरातील स्टेशन रस्त्यावरून जातांना लाल भडक फलकावर गुरु टी हाऊस, गावराण गुळाचा चहा असा फलक लागलाय. हा फलक पाहूण रस्त्याने जाणारे येणारे नागरीक कुतूहलाने या फलकाकडे पाहून'चव तर घेऊ...' असे म्हणून सरळ गुरुच्या चहा टपरीवर येत आहेत. मग काय गुरुच्या हाताने बनविलेला गावरान गुळाचा चहा ओठाला लावताच चहा शौकिन तृप्त होतांना दिसत आहेत.

स्पर्धा परीक्षांचा सोडला नाद

आता तुम्ही म्हणाल की, गुरु अशिक्षित असावा..! तर तुमचा हा गोड गैरसमज आहे. गुरु चक्क पदवीधारक आहे. आणि त्याने औरंगाबाद शहरात राहून स्पर्धा परीक्षाही दिल्या आहेत. प्री परीक्षा पास झाल्यानंतर मेनला त्याला यश आले नाही. आपण दिव्यांग आहोत काय करावे हा विचारही गुरुसिंहच्या मनाला कधी शिवला नाही. या गड्याने हार न मानता परभणीत येऊन सरळ चहाचा व्यवसाय सुरु केला. कामाची इच्छेने त्याच्या अपंगत्वावर मात केली आहे.

गुरुसिंहचा व्यवसाय जोमात सुरु

दररोज 60 लिटर दुध खरेदी करून चहा तयार केला जातो. सुरुवातीला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून व्यवसायासाठी गुरुसिंह याने दीड लाखाचे कर्ज काढले होते. आच गुरुसिंहचा व्यवसाय जोमात सुरु आहे. त्यांच्यासोबत रोजंदारीने तीन तरूण काम करतात. तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वताचा व्यवसाय सुरु करावा असे गुरुसिंह चंदेल सांगतो. त्याच्या वडीलांचाही हॉटेलचाच व्यवसाय आहे. शरीराने दिव्यांग असतांनाही मनाने मात्र आपण अभंग असल्याचे गुरुसिंह चंदेल याने सिध्द केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapped Youth runs tea stall in Parbhani