तो म्हणतो हलका का होईना पण मी येणारच, काय ते वाचा...

कैलास चव्हाण
Friday, 24 April 2020

परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात येत्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे.

परभणी ः मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्‍वच्‍छ ते अंशत: ढगाळ राहुन तापमानात किंचीत वाढ होईल. हिंगोली जिल्‍हा वगळता इतर जिल्‍ह्यात ता.२८ व २९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे.

मराठवाड्यात यंदा उशिराने उष्णतेची लाट सुरु झाली आहे. याआधी संपूर्ण हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि सातत्याने पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर उन्हाळा सुरु झाल्यानंतरही ढगाळ वातावरण राहिल्याने उन्हाची तिव्रता जाणवली नाही. 

हेही वाचा - Video ः विनाकारण फिरताय..? मग मिळेल काठीचा प्रसाद, कुठे ते वाचा..

शुक्रवारी राहिले ढगाळ वातावरण
दोन आठवड्यापुर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच मागील आठवड्यात देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता मागील चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असताना पुन्हा शुक्रवारी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहुन २८ आणि २९ रोजी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला कृषि विद्यापीठाने दिला आहे.

हेही वाचा - शेती विषयक आस्थापनांसाठी दिलासा....काय ते वाचा

उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव 
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील पाच टक्के ३० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आंबेबहार धरलेल्‍या संत्रा व मोसंबी फळबागेत पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम टक्के, चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. 

बागेत जैविक आच्‍छादनाचा वापर करावा
नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी. तसेच बागेत जैविक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्‍याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे असा सल्ला कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने दिला आहे.

उन्हाचे चटकेही बसण्यास सुरवात
जिल्ह्यात दररोज उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात झाली आहे. मार्चपासून परभणीचे तापमान ४० अंशांवर असते. ते सध्या ४३ पर्यंत गेले आहे. अजून मे महिना बाकी आहे. यामुळे उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. सध्या शहरवासियांना ‘कोरोना’मुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तर घरात थंडावा निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी, दुरुस्ती करणेही अवघड होऊन बसले आहे. यामुळे नागरिक उन आणि ‘कोरोना’च्या कात्रीत सापडले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He says why not light but I will come, read it, parbhani news