सायकल चोरी करता करता तो घरफोड्याही करु लागला! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

अटकेनंतर 31 सायकलसह 63 ग्रॅम सोने जप्त 

औरंगाबाद- सायकल चोरीचा फंडा जमल्यानंतर त्याने एक दोन नव्हे तब्बल 31 सायकल चोरी केल्या. त्यात जम बसल्यानंतर मग तो घरफोडीकडेही वळला. परंतु पोलिसाची नजरही त्याच्याकडे वळली अन..तो गळाला लागला. त्याच्याकडून सायकलसह घरफोडीतील 63 ग्रॅम सोनेही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई सात ऑक्‍टोबरला करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रकांत विठ्ठल मगरे (वय 35, रा. मुकुंदवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याने डॉ. सरोज रामलिंग बेंबळकर-पांडे (रा. देवानगरी, शहानुरवाडी) यांचे 21 सप्टेंबरला घर फोडून दोन तोळे मणी मंगळसुत्र लंपास केले होते. तसेच रमाकांत दिवाकर कुलकर्णी (रा. कांचननगर, प्रतापनगर) यांचे घरफोडून त्याने चार तोळ्याच्या बांगड्या लंपास केल्या होत्या.

तो उस्मानपुरा भागात असल्याचे समजल्यानंतर संशयावरुन चंद्रकांत याला उस्मानपुरा ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने घरफोड्यांची कबुली दिली. विशेषत त्याने यापुर्वी एक दोन नव्हे तब्बल 31 सायकल चोरल्याची बाब समोर आली. त्याच्याकडून या सायकलसह एकूण 63 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He used to steal a bicycle and even broke into a house!