शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain crop Damage Compensation

शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत मदत

औरंगाबाद : यंदा पावसाने मराठवाड्यात सरासरी ओलांडली. अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी आणि शंखी गोगलगायीच्या पिकांवरील प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्हीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी मराठवाड्यासाठी १ हजार ८ कोटी ३० लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान मंगळवारी (ता. २०) विभागीय आयुक्तालयातून वितरित करण्यात आले. येत्या आठ दिवसांत संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाला मराठवाड्यातील शेती सामोरी जात आहे. सलग चौथ्या वर्षी मराठवाड्यात खरीप हंगाम हातून गेला आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल ११ लाख ७८ हजार ३७० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.

इतक्या शेतकऱ्यांचे पिकाचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे. याशिवाय गोगलगाय आणि सततच्या पावसामुळेही विभागात सुमारे पावणेपाच लाख शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी सावरला पाहिजे यासाठी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या जुन्या दरापेक्षा दुपटीने मदत देण्याचे जाहीर केले. शिवाय पूर्वी २ हेक्टरपर्यंत देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये यंदा वाढ करून ३ हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढविण्यात आले आहे.

औरंगाबाद, बीड सध्या वगळले

मदतीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांच्या बीडीएसवर जमा होईल. त्यानंतर तो बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची नोंद नसल्याने मदतीमधून सध्या हे दोन जिल्हे वगळण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Heavy Rain Crop Damage Compensation Aurangabad Farmer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..