Vaijapur News: महालगाव परिसरात पावसाचा धुमाकूळ; गहू, हरभरा, कांदा, मका या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rain Mahalgaon crops damage Two cows died due to lightning weather

Vaijapur News: महालगाव परिसरात पावसाचा धुमाकूळ; गहू, हरभरा, कांदा, मका या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान...

महालगाव : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महालगाव (ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) परिसरात पावसाचा तडाखा बसला आहे. यात रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दि. 7 रात्री सुमारे 2 वाजेपासून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यात शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महालगाव सह चोरवाघलगाव, चिंचडगाव, शिरजगाव, माळी सागज, भगूर, वक्ती,पानवी, घोगरगाव, अव्वलगाव, नागमठाण, शनिदेव गाव,चेंडूफळ आदी गावांमध्ये पावसाचा जोर अधिक पहायला मिळाला.

यामुळे शेतात सोगणीला आलेला गहू, हरभरा, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दोन दिवसा पासून पाऊस पडत आहे त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रशासनाच्या वतीने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.या पावसामुळे काढणीसाठी आलेल्या गव्हाच्या पिकांसह हरभरा, कांदा, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात सुरू असलेल्या या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उभं गव्हाचे पीक अक्षरशः आडवे पडायला सुरुवात झाली आहे.

शेतकरी अडचणीत खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळाले नाही. जे मिळाले त्याला देखील चांगला भाव मिळालेला नाही. यात आता रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने चांदेगाव येथे विष्णू पवार यांच्या शेतात वीज पडून दोन गायी मरण पावल्या.

अगोदरच खरीप हंगामातील पिकांना भाव नाही अवकाळी पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे देखील केले पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही मिळालेला नाही. अशातच रब्बी हंगामात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने माझा तीन एकर गहू संपूर्ण आडवा झाला आहे पिकाचा त्वरित पंचनामा करून सरकारने मदत द्यावी.

- दादासाहेब पवार प्रगतशील शेतकरी चोरवाघलगाव