निलंगा परिसर अन् वडवळ नागनाथला जोरदार पाऊस पिकांना मिळाले जीवदान

राम काळगे/संतोष आचवले
सोमवार, 29 जून 2020

निलंगा शहरासह परिसरात सोमवारी (ता.२९) सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे नाल्यांना पाणी आले. त्यामुळे निलंगा-तुपडी मार्गे लातूरला जाणाऱ्या रस्त्यावरील उमरगा-हाडगा येथील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.

निलंगा/वडवळ नागनाथ (जि.लातूर) : निलंगा शहरासह परिसरात सोमवारी (ता.२९) सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे नाल्यांना पाणी आले. त्यामुळे निलंगा-तुपडी मार्गे लातूरला जाणाऱ्या रस्त्यावरील उमरगा-हाडगा येथील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना पोषक वातावरण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी चांगला पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील राठोडा, उमरगा-हाडगा, हाडगा-उमरगा, सिंदीजवळगा, केळगाव या गावांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे निलंगा-तुपडीमार्गे लातूरला जाणाऱ्या उमरगा-हाडगा येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे रस्त्याची वाहतूक जवळपास तीन तास ठप्प होती. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने व नागरिक थांबलेले दिसत होते. त्यातच अंबुलगा व राठोड येथील दोन मोटरसायकलस्वार रस्ता ओलांडताना बालंबाल बचावले. त्यामध्ये मोटरसायकल वाहून गेल्यानंतर गावकऱ्यांनी दोरीद्वारे मोटरसायकल पाण्याबाहेर काढली. मोठ्या प्रमाणात ओढ्याला पूर आल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

इंधन दरवाढी विरोधात लातुरात काँग्रेसचे निदर्शने, सायकलवरुन गाठले कार्यालय

त्यातच या ओढ्यावरील पुलाची उंची व रुंदी कमी असल्यामुळे अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे ओढ्याला पूर येऊन हा रस्ता सतत बंद होतो. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होत असल्यामुळे ही या मार्गावरील प्रवाशाची नित्याचीच समस्या असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे या पुलाची उंची व रुंदी वाढवावी अशी मागणी अनेक वेळा प्रशासनाकडे करूनही याबाबत दखल घेतली जात नसल्याचा आरोप उमरगा व हाडगा गावातील ग्रामस्थांनी केला आहे. सायंकाळी झालेला पाऊस विविध भागात झाल्यामुळे खरीप पिकांसाठी पोषक मानला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केला जात असली तरी पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.

दमदार पावसामुळे टोमॅटो, पिकांना जीवदान
प्रदीर्घ विश्रांतीनंतर वडवळ नागनाथ (ता.चाकूर) येथे सोमवारी (ता.२९) पहाटे वीस मिनिटे दमदार पाऊस झाल्याने खरिपात पेरलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. हा पाऊस ३८ मिलिमीटर इतका नोंदला गेला असून, आतापर्यंत येथे १९८ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात येथे पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो, कोबी आणि इतर भाजीपाल्यांसह सोयाबीन, तूर, मूग व मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर तब्बल दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पावसाअभावी ही पेरणी दुबार करावी लागते की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. तसेच टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याला पावसाची नितांत गरज होती. सोमवारी पहाटे वीस मिनिटे झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Nilanga, Wadwal Nagnath Latur News