हिंगोली जिल्ह्यात पहाटेपासूनच मेघगर्जनेसह जोरदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingli rain

हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकाला जागेवर कोंब फुटत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात पहाटेपासूनच मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

हिंगोली :  जिल्ह्यात पहाटे पाच वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले असून शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी वाहत आहे. पावसाने मात्र काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीला पुर आला.

मंगळवारी (ता.२२) पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या पावसाचा सकाळी नऊ वाजेपर्यंत जोर कायम होता. शहराच्या सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी सहापासून शहरात येणाऱ्या दुध विक्रेत्यांना अडचणी आल्या. पावसाने रेल्वे स्थानक, सरस्वती नगर, गांधी चौक, मंगळवारा, फुलमंडी, सराफा, कपडा गल्ली, जलेश्वर मंदिर परिसर जवाहर रोड, रेल्वे स्थानक रस्ता, आदी भागातील रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत होते. तर अनेकांच्या छतावर जमा झालेले पावसाचे पाणी नागरिक काढत होते. दरम्यान जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकाला जागेवर कोंब फुटत आहेत.

जिल्ह्यात हिंगोलीसह वसमत कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील सर्वदुर हा पाऊस झाला. या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने पिकांना पावसाची आवश्यकता होती. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला मोड फुटल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात तीन लाख ८० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. तर दोन लाख ५८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यातील इसापुर, सिध्देश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. या दोन्ही धरण क्षेत्रातील भागात होत असलेल्या पाण्याची आवक पाहता इसापुर धरणाचे अकरा तर सिध्देश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीला पुर आला. तर समगा ते हिंगोली मार्गावर असलेल्या कयाधु नदीवरील छोट्या पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गावर असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला. शहरालगत असलेल्या हिंगोली नांदेड रस्त्यावर केमिस्ट भवन जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथे पाणी जमा झाल्याने काही वेळ हा रस्ता बंद होता. दहा वाजेनंतर पावसाचा जोर काहीप्रमाणात कमी झाला असून, ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top